कायद्याचा सल्ला

माझी एक लांबची आत्या माझ्या शेजारील खोलीमध्ये राहत होती. तिला कुणीही जवळचे वारस नाहीत. तिच्या हयातीपर्यंत माझी आई तिची देखभाल करीत होती. माझी ही आत्या हयात असताना तिने तिच्या नावावर दोन ठेवी बॅंकेमध्ये ठेवल्या होत्या व या ठेवीवर तिने माझे आईचे नाव देखील लावले होते व दुसऱ्या ठेवीवर माझे आईचे नाव नॉमिनी म्हणून काढले होते. नुकतेच माझे या आत्याचे निधन झाले आहे. माझे आईने सदर रकमा बॅंकेतून मिळविण्याअगोदर माझे आत्याचे एक लांबचे नातेवाईकाने या रकमांवर त्याचा हक्क सांगण्याबाबत माझे आईला त्यांचे वकिलाकडून नोटीस पाठवली असून या नोटीसमध्ये माझे आत्याला मी व माझे आईने मारून टाकले असा खोटा आरोप केला आहे तर याबाबत आम्हास काय करावे लागेल?
उत्तर : अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रथम तुम्हाला आलेल्या नोटीसला उत्तर द्यावे व त्यामध्ये तुमचेविरुद्ध केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत असे कळवावे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे मयत आत्याचे बॅंकेमध्ये जाऊन तिच्या नावावर असलेल्या ठेवीच्या रकमेची मागणी करावी. ज्या ठेवीवर तुमचे मयत आत्याचे व आईचे नाव आहे त्या ठेवीची रक्कम मिळण्यास तुम्हास कुठलेही आडकाठी नाही. मात्र ज्या ठेवीवर तुमचे आईचे नाव नॉमिनी म्हणून आहे. त्यासाठी तुम्हास बॅंक मे. कोर्टाकडून वारस दाखला आणण्यास सांगू शकेल. अथवा तुमचेकडून प्रतिज्ञापत्र व इन्डेमनिटी बॉंड घेऊन तुम्हास ही रक्कम देऊ शकेल.


आमची 15 लोकांची मिळून एक पतपेढी आहे व या पतपेढीमध्ये मी एक संचालक आहे. मला डोळ्याची समस्या असून मला व्यवस्थित दिसत नाही व मी पतपेढीच्या कुठल्याही कामात प्रत्यक्षपणे भाग घेत नाही. नुकतेच आमचे पतपेढीमधील एका सभासदाने त्याला त्यांचे ठेवीची रक्कम वेळेवर परत मिळाली नाही. या कारणास्तव मे. पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे व या अर्जात पतपेढीमध्ये अफरातफर झाल्याबाबत आरोप केला आहे. तरी या तक्रार अर्जाचे अनुषंगाने याबाबतीत पोलीस काय कारवाई करतील व याबाबत मला मे. कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेता येईल का?
उत्तर : आपले संस्थेमध्ये झालेल्या अफरातफरीबाबत केलेल्या तक्रारी अर्जाबाबत पोलीस प्राथमिक चौकशी करून व तक्रार अर्जदारांकडे असलेले पुरावे बघून आपले संस्थेतील सर्व संचालकाविरुद्ध इं. पि. कोड कलम 34, 406, 409 व 420 प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतील व आपण सर्वांस अटक करू शकतील. तुम्ही जर याबाबत त्वरित मे. कोर्टामध्ये फक्त तुमच्यासाठी अटकपूर्व जामिनचा अर्ज केला तर याबाबत मे. न्यायालय या अर्जावर संबंधित पोलिसांचे म्हणणे घेऊन मग तुम्हास अटकपूर्व जामीन देऊ शकतील.


आमचा एक सख्खा चुलता हा अविवाहित होता व त्यांचेकडे स्व-कमाईची खूप स्थावर व जंगम मिळकत होती. आमचे वरील चुलत्याने सुमारे 5 वर्षांपूर्वी एका स्त्रीला त्यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून त्यांचेजवळ राहण्यास घेतले होते व आमचे चुलत्यांचे या ठेवलेल्या स्त्रीबरोबर अनैतिक संबंध होते. आमचे चुलत्यांचे नुकतेच निधन झाले व त्यांचे पश्‍चात आता आमचे चुलत्याची इस्टेट आम्हास मिळणे आवश्‍यक आहे. परंतु आम्हास असे खात्रीलायकरित्या समजले आहे की, आमच्या चुलत्याबरोबर राहात असणाऱ्या स्त्रीने ही सर्व इस्टेट तिला मिळण्यासाठी एक खोटे इच्छापत्र केले असून यावर आमचे चुलते यांना सही येत असतानादेखील त्यावर त्यांचे अंगठे घेतले व त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या आहेत. या इच्छापत्राबरोबर कुठल्याही डॉक्‍टरचा मेडिकल दाखला घेतलेला नाही तर आम्हास याबाबत काय कारवाई करावी लागेल?
उत्तर : प्रथम तुम्ही तुमचे चुलत्याबरोबर रहात असणाऱ्या स्त्रीविरुद्ध रितसर संबंधित पोलिसाकडे तक्रार अर्ज द्या व त्यामध्ये तिने फसवणुकीच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे केली आहे असे नमूद करा. त्याचप्रमाणे तुम्ही याबाबतीत मे. दिवाणी न्यायालयामध्ये सदरचे इच्छापत्र खोटे असल्याने ते रद्द करण्यासाठी दावा करावा. या दाव्याचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तुमचे चुलत्याची स्थावर व जंगम मिळकत मिळू शकेल.


आमचे कुटुंबांस आमचे वडिलांकडून वडिलोपार्जित मिळकत मिळाली आहे. याबाबत या मिळकतीस आमची नावे लागण्यासाठी आम्ही सिटी सर्व्हे ऑफिसला अर्ज केला होता. याबाबत आमचे चुलते यांना नोटीस दिली गेली. या कारणावरून आमचे चुलते व चुलत भाऊ आमचे घरी आले व त्यांनी या कारणावरून आमचेशी वाद घातला व त्या दिवशी आमचेविरुद्ध पोलिसांकडे खोटी तक्रार दिली व त्यांना आम्ही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे सांगितले. या तक्रारीवरून पोलिसांनी आमचेविरुद्ध इं. पि. कोड कलम 324, 504 व 506(1) प्रमाणे कारवाई केली व आम्हास अटक केली. त्यानंतर आम्ही या केसमध्ये जामिनावर सुटलो. आता या केसचा निकाल मे. कोर्टामध्ये लागला असून आम्हास मे. कोर्टाने निर्दोष सोडले आहे. तरी याबाबत आम्ही काय करावे?
उत्तर : प्रथम तुम्ही तुमचे हिंदू एकत्र कुटुंबाचे मिळकतीचे आपापसात सरसनिरस वाटप व्हावे म्हणून दिवाणी दावा दाखल करावा. त्याचप्रमाणे तुमचेविरुद्ध असलेल्या फौजदारी खटल्यातून तुमची निर्दोष सुटका झाल्याबाबत या फिर्यादीमधील फिर्यादी यांचेविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करावा म्हणजे तुम्हास या प्रकरणामध्ये न्यायालयातून योग्य तो न्याय मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.