कायद्याचा सल्ला

मी माझ्या मित्राला आठ महिन्यांपूर्वी दोन लाख रुपये इतकी रक्कम हात उसने म्हणून दिली होती. सदर रक्कम मी माझ्या बॅंकेच्या चेकने दिली होती. सदर रकमेची परतफेड म्हणून माझ्या मित्राने मला त्याच्या बॅंकेचा पुढील तारखेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश मी सहा महिन्यांनंतर माझ्या बॅंकेत भरला परंतु सदर धनादेश “खात्यात पुरेशी शिल्लक नाही,’ या कारणाने परत आला. त्यानंतर मी माझ्या मित्राला संपर्क साधला व माझी रक्कम मागितली. त्यानंतर माझ्या मित्राने माझ्या खात्यावर एक लाख रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर केली. परंतु उर्वरित रक्कम परत देण्यात माझा मित्र टाळाटाळ करीत आहे. तरी मी आता याबाबत परक्राम्य लेख अधिनियम कलम 138 नुसार (निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस ऍक्‍ट) फिर्याद करू शकतो का?

आपल्या मित्राने या व्यवहारातून आपली फसवणूक केली आहे. आपला विश्‍वासघात केला आहे. आपण याबाबत त्याच्याविरुद्ध फौजदारी व दिवाणी कारवाई करू शकता. परंतु आपणास आपल्या मित्राविरुद्ध परक्राम्य लेख अधिनियम कलम 138 नुसार कारवाई करू शकत नाही; कारण आपल्या मित्राने आपल्याला निम्मी रक्कम परत केली आहे. त्यामुळे आपण आता त्याला एक कायदेशीर नोटीस पाठवावी व त्यामध्ये आठ दिवसाच्या आत रक्कम परत घेण्याबाबत सूचना करावी. या नोटीसमध्ये आपण सविस्तरपणे आपले दरम्यान झालेल्या व्यवहाराचा तपशील द्यावा व आपण आपल्या मित्रावर फसवणूक व विश्‍वासघाताचा आरोप करावा. सदर नोटीस मिळूनदेखील जर आपल्या मित्राने आपणास रक्कम दिली नाही तर आपण आपल्या मित्राविरुद्ध पोलिसात तक्रार अर्ज द्यावा. या अर्जाची पोलिसांनी दखल घेतली नाही तर आपण आपल्या मित्राविरुद्ध फौजदारी कोर्टामध्ये म्हणजेच जेएमएफसीकडे खासगी फिर्याद द्यावी.

त्याचप्रमाणे आपण आपली उर्वरित रक्कम एक लाख रुपये मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात संक्षिप्त दावा वसुलीसाठी करावा म्हणजे आपणास आपल्या मित्राकडून एक लाख रुपये रकमेच्या वसुलीचा हुकूमनामा मिळू शकेल. एवढे करूनदेखील जर आपल्या मित्राने आपली रक्कम परत केली नाही तर आपण आपल्याला मिळालेल्या हुकुमनाम्याच्या आधारे दरखास्त दाखल करावी व आपल्या मित्राच्या स्थावर व जंगम मिळकती जप्त करून विकून आपण आपली रक्कम वसूल करू शकता.

मी एका सहकारी बॅंकेकडून सदनिका विकत घेण्यासाठी नऊ लाख रुपये रकमेचे कर्ज घेतले होते व यासाठी मी माझी सदनिका या बॅंकेकडे गहाण ठेवली होती. मी ही सदनिका 22 लाख रुपयांना विकत घेतली होती. सदर सदनिकेवर असलेले कर्जाचे हप्ते मी नियमितपणे दोन वर्षे भरत होतो. परंतु त्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे व माझी तब्येत ठीक राहिली नसल्या कारणाने मी बॅंकेचे हप्ते भरू शकलो नाही. त्यावेळेस बॅंकेने कर्जवसुलीसाठी मला व माझ्या कुटुंबाला त्रास दिला आणि बॅंकेने माझ्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 101 अन्वये कर्ज वसुलीचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला. त्यामुळे नाईलाजाने मला माझी सदनिका कमी किमतीत विकावी लागली व यामध्ये माझे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. तरी आता मी बॅंकेचे पूर्णपणे कर्ज फेडले आहे. अशा रीतीने बॅंकेने मला दिलेल्या त्रासाबाबत व नुकसानभरपाई मिळण्यासाठी काय कायदेशीर कारवाई करू शकतो?
आपण दिलेल्या माहितीवरुन असे दिसत आहे की बॅंकेने आपल्याविरुद्ध बेकायदेशीरपणे कर्जवसुली केली आहे. वास्तविक पाहता, रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बॅंकेने आपल्याला कर्जफेडीसाठी काही मुदत देणे अपेक्षित होते. आपल्याला बॅंकेने दिलेला त्रास ही बाब एक मोठी सेवेबाबतची त्रुटी आहे व अशा रीतीने बॅंकेने आपल्याला सदनिका कमी किमतीत विकण्यास भाग पाडले, ही पण एक सेवेतील त्रुटी आहे. आपण बॅंकेकडून कर्ज घेतले त्यामुळे आपण बॅंकेचे ग्राहक आहात त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे आपण याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करावा व या अर्जामध्ये आपण आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल व बॅंकेच्या गैरवर्तणुकीबाबत सविस्तर माहिती द्यावी. या अर्जाचे कामी आपण आपला तक्रार अर्ज सिद्ध करण्याकरिता योग्य ते तोंडी व लेखी पुरावे द्यावे. सदर प्रकाराबाबत आपण ग्राहक न्यायालयात मुंबई हाय कोर्टाने संदर्भ केस नंबर 195 (2) बॉम्बे सि.आर.5 या केसचा आधार घ्यावा. अशाप्रकारे आपण अर्ज केल्यानंतर ग्राहक न्यायालय बॅंकेला नोटीस काढेल व आपला तक्रार अर्ज ग्राहक न्यायालय गुण-दोष बघून आपल्याला नुकसान भरपाई देऊ शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)