कायद्याचा सल्ला

मी माझे एका मित्राला रक्कम रु. 20,00,000/- (अक्षरी रु. वीस लाख) कर्जास जामीन आहे. परंतु आता माझा मित्र बॅंकेचे हप्ते वेळेवर भरत नाही. जर माझे मित्राने ही रक्कम बॅंकेत भरलीच नाही तर मला काही अडचण येऊ शकते का?

सध्याच्या काळात सर्व लोकांस कोणत्या तरी कारणाने बॅंकेकडून, पतसंस्थेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणे ही आवश्‍यक गोष्ट झाली आहे. सदरची कर्जे ही सर्वसामान्य माणसापासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत घेतली जातात.

प्रचलित पद्धतीनुसार अशा सर्व कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस कर्ज मिळविण्याकरिता स्थावर व जंगम मिळकत, वस्तू, बॅंक अथवा वित्त संस्था इ. कडे गहाण ठेवणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे जवळ जवळ सर्वच कर्ज प्रकरणात कर्जाची परतफेडीची हमी म्हणून जामीन देणे आवश्‍यक असते, यासाठी जामिनदाराचे उत्पन्न अथवा स्थावर मिळकत बघून व त्याबाबतचे कागदपत्रांची खात्री व छाननी, पतसंस्थेची वा वित्तीय संस्थेची संचालक मंडळे वेळोवेळी ठरवीत असतात. वरीलप्रमाणे बॅंका इत्यादी संस्था कर्ज प्रकरण करताना कर्जदाराकडून व जामिनदाराकडून त्यांचेशी कर्जाचा व्यवहार झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी, विविध प्रकारची कागदपत्रे करून घेत असतात व त्यामध्ये मुख्यत्वे कर्ज, अर्ज, करारनामा, वचनचिठ्ठी, गहाणखत, पुढील तारखेचे धनादेश व इतर अनुषंगिक कागदपत्रे इत्यादीचा समावेश असतो.

बॅंका, पतसंस्था व वित्तीय संस्था यांनी त्यांचे कर्ज प्रकरण करताना केलेला करार कायदेशीर वैध असणे आवश्‍यक असते व या सर्व बाबतीत करार कायद्यातील कलमांचा विचार करून व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करावी लागतात. करार कायद्याच्या कलम 126 मध्ये जामिनकार्याचा करार, मुख्य धनको व ऋणको यांच्या व्याख्या दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या करारामध्ये त्रयस्त व्यक्तीसाठी त्यांनी कर्जाच्या जबाबदारीबाबत वचन दिलेले असते अथवा हमी दिलेली असते अशा करारास जामिनकीचा करार असे म्हटले जाते. अशारितीने हमी देणाऱ्या जामिनदार असे म्हणतात व ज्या व्यक्तीसाठी जामीन दिला जातो, त्या व्यक्तीस/संस्थेस त्या ऋणको म्हटले जाते. सदर हमी तोंडी अथवा लेखी असू शकते. भारतीय करार कायदा कलम 127 प्रमाणे जामिनदारांसाठी मोबदला हा मुख्य कर्जदारास दिलेली रक्कम समजण्यात येते. करार कायदा कलम 128 प्रमाणे जामिनदाराची जबाबदारी ही मुख्य कर्जदाराइतकीच असते. कर्जदाराने प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते वेळोवेळी धनकोकडे भरले व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला नाही तर जामिनदारास कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. जामिनदाराने कुठल्याही व्यक्तीला जामीन राहताना कर्जदाराची आर्थिक स्थिती व तो ऋणकोस देत असलेल्या इतर तारणाबाबत सखोल माहिती घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे जामिन राहणे हे जामिनदाराच्या दृष्टीने हिताचे असते. असे न बघता जामिनदाराने कर्जासाठी हमी घेतल्यास व त्यामध्ये मुख्य कर्जदाराने कर्ज रक्कम भरण्यामध्ये कसूर केला तर ही थकीत कर्जाची रक्कम जामिनदारास भरावी लागते, ही रक्कम भरण्यासाठी जामिनदार हा मुख्य कर्जदाराइतकाच जबाबदार असतो.

भारतीय करार कायद्यानुसार अशारितीने कर्जदाराने ऋणकोचे कर्ज परत फेडण्यास कसूर केला तरच जामिनदारावर कर्ज परतफेडीची जबाबदारी येते. सदर जबाबदारी ही जामिनदाराची कर्जदाराबरोबर संयुक्त व वैयक्तिक अशी असते. बॅंकांना, पतसंस्थांना, वित्तीय कंपन्यांना म्हणजेच या ऋणकोना त्यांची कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी मुख्य कर्जदाराचे विरुद्ध जेवढे हक्क व अधिकार असतात ते सर्व हक्क व अधिकार जामिनदाराच्या विरुद्ध वापरता येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.