कायद्याचा सल्ला

प्रश्‍न- जागा खरेदी करताना जागेचा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट) घेणे आवश्‍यक असते का? हा अहवालामध्ये कोणते मुद्दे आवश्‍यक असते? कुठल्या वकिलास शोध अहवाल घेता येतो?
उत्तर- स्थावर मिळकत घेताना किंवा हस्तांतरण होत असताना एक अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे शोध अहवाल त्यालाच आपण सोप्या भाषेत सर्च रिपोर्ट असे म्हणतो. सर्च रिपोर्ट हा कशासाठी घ्यावयाचा असतो, तर आपम जी मिळकत घेत आहोत किंवा घेणार आहोत त्या मिळकतीची मालकी ही निर्वेध, निजोखमी व कुठलाही बोजा नसलेली असावी हे तपासून घेण्यासाठी शोध अहवाल हा महत्त्वाचा असतो. सदर शोध अहवाल हा कुठल्या वकिलांकडून (असे वकील ज्यांनी पाच वर्षे वकील म्हणून काम केले आहे) करून घेता येतो. हा शोध अहवाल घेण्यासाठी मे. सब रजिस्ट्रार साहेब यांच्याकडे अर्ज करून त्यावर असलेले शुल्क भरावे लागते. सदर शुल्क भरल्यानंतर त्या मिळकतीबाबत कुठला व्यवहार झाला आहे किंवा त्या मिळकतीचे किती मालक आहेत, किती वर्षापासून त्यांच्याकडे त्याचे मिळकतीची मालकी आहे.

किंवा त्या मिळकतीबाबतचे 7/12 चे उतारे, त्या 7/12 वरती कोणाची नावे आहेत व ती कुठल्या फेरफार नंबरने 7/12 वर दाखल झाली त्या फेरफारीचा उतारा किंवा मूळ मालकाने एखाद्या बॅंकेतून किंवा अन्य ठिकाणावरून कर्ज या मिळकतीवर कर्ज घेतलेले आहे का? किंवा ती मिळकत वतन कायदा किंवा कुळ कायद्याच्या खाली येते का? या सर्व नोंदी आपल्याला सब रजिस्ट्रार साहेब यांच्या रजिस्टरमध्ये नोंदविलेले आढळेल. शोध अहवाल हा मागील 30 वर्षाचा घ्यावा म्हणजेच मिळकत ही निर्वेध व निजोखमी आहे की नाही याचा शोध घेता योतो. शोध अहवालामध्ये मुखत्वे खालील गोष्टींचा तपशिल असणे आवश्‍यक आहे.

1) मिळकतीचे वर्णन, 2) मिळकतीच्या चतुःसीमा, 3) मिळकतीचा 7/12 चा उतारा, 4) मिळकतीच्या फेरफारीच्या नोंदीचा उतारा, 5) मिळकतीवरचा कर भरला असल्यास त्याची पावती, 6) मिळकत ही ग्रामपंचायत हद्दीत येते किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत येते त्याप्रमाणे त्याचा उतारा, 7) मिळकतीवर कर्ज असल्यास कर्ज खाते उतारा, 8) मिळकतीवर जर बांधकाम झाले असल्यास त्या मिळकतीच्या इमारतीचा नकाशा व त्याच्या मंजुरीबाबतचा तपशिल, 9) मिळकत ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात झोन दाखला अथवा कलेक्‍टरकडून घेतलेली बिगरशेतीचा परवान्याचा तपशिल, 10) मिळकतीवर भाडेकरू किंवा लायसेन्सी इत्यादी कोणी असेल तर त्याचा तपशिल, 11) मिळकत कुठल्या दाव्याचा विषय नाही हे पाहण्याकरीता या मिळकती संदर्भात लीज पेन्डेन्सी आहे की नाही हे तपासून घेणे, 12) कोर्टाच्या रजिस्टरमध्ये कुठल्याही मिळकतीसंदर्भात वाद चालू नाही किंवा बोजा नाही हे पाहण्याकरिता कोर्ट रजिस्टर तपासणे. 13) मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याबाबत मिळकतीच्या मालकांकडून प्रतिज्ञापत्र घेणे. 14) पेपरमध्ये जाहीर नोटीस देऊन त्या मिळकती संदर्भात कोणाचेही हक्क व अधिकार असल्यास त्याबाबत हरकत मागविणे. 15) मिळकतीवर आयकर अथवा धनकर नसल्याबाबतची खात्री करून घेणे. 16) शोध अहवाल (सर्च रिपोर्ट) मध्ये मिळकत निर्वेध व निजोखमी असून ती मिळकतीच्या बाजारभावाप्रमाणे विकण्यास योग्य आहे.

मिळकत हस्तांतरण होत असताना शोध अहवाल ही महत्त्वाची बाब असते व या शोध अहवालाशिवाय कुठलीही बॅंक अथवा वित्तीय संस्था त्या मिळकतीच्या तारणावर कर्ज देत नाही. एकदा शोध अहवाल घेतल्यानंतर कालांतराने पुन्हा मिळकत विक्रीस काढल्यास दरम्यानच्या काळातील शोध अहवाल काढून ती मिळकत विकता येते. मिळकत खरेदी विक्रीच्या व्यवहारास मिळकत हस्तांतरण कायद्यानुसार मिळकत विकत घेणाऱ्या इसमावर ही मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री करून घेणे असे बंधनकारक केलेले आहे व जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे कुठल्याही इसमाने मिळकत विकत घेताना असा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट) मालकीच्या कागदपत्रावरून कायमस्वरुपी ठेवणे आवश्‍यक आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×