कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – मी एक जागा खरेदी करण्यासाठी साठेखत केले होते व त्याप्रमाणे मी त्या मिळकतीच्या मालकास रक्‍कम रु. 10,00,000/- दिले. या साठेखताप्रमाणे रक्‍कम 2,00,000/- खरेदीखताच्या वेळेस देण्याचे ठरले होते व अशारितीने एकूण रक्‍कम रु. 12,00,000/- घेण्याचे कबूल केले होते. सदर करार आम्ही मुद्रांक फी व नोंदणी फी भरून नोंदविला आहे. साठेखतात ठरले याप्रमाणे या साठे खतावरून खरेदी करण्याची मुदत ही तीन वर्षांची होती; परंतु या साठेखतांमध्ये कुठल्या तारखेस हे खरेदीखत निश्‍चित करण्याचे ठरले नव्हते. मी या मिळकत खरेदी देणाऱ्या व्यक्‍तीस कायदेशीर नोटीस पाठवून उर्वरित रक्‍कम 2,00,000/- घेऊन खरेदीखत करून देण्याची मागणी केली; परंतु दरम्यानच्या काळात दाव्याच्या किमती वाढल्यामुळे आता हा घरमालक खरेदीखत करून देण्यास तयार नाही व तो मी दिलेली रक्‍कम व्याजासकट परत द्या व करार रद्द करा असे सांगत आहे. तरी मला या जागेचे खरेदीखत करण्यासाठी काय करावे लागेल व त्यासाठी दावा करायचा झाल्यास काय करावे लागेल?
उत्तर – सध्याच्या काळात जागेच्या किमती भरमसाठ वाढत असल्यामुळे असे प्रकार होत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे दावे मे. न्यायालयात दाखल होत असतात. आपल्या प्रश्‍नात आलेल्या माहितीमधून आपण जमीन मालकाबरोबर करार केला आहे व तो स्टॅम्प व नोंदणी फी भरून नोंदविला ही आपली जमेची बाजू आहे. सदर कराराप्रमाणे मिळकत हस्तांतरण कायदा 53 प्रमाणे जरी आपणांस या जागेबाबत मालकीबाबत कुठलेही हक्‍क व अधिकार मिळत नसेल तरी विशिष्ट करारपूर्तीचा कायदा ऍक्‍टनुसार आपण दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडे दावा करून या मिळकतीचे खरेदीखत व ताबा मागू शकता. त्याचप्रमाणे तुमचे करारामध्ये खरेदीखतासाठी कुठलेही निश्‍चित तारीख नसल्यामुळे आपण नोटीस दिल्यानंतर 3 वर्षांचे आतमध्ये हा दावा मे. न्यायालयामध्ये दाखल करू शकता. आपण जमीन मालकांस नोटीस देताना त्याबरोबर उर्वरित रक्‍कम रुपये 2,00,000/- चा धनादेश पाठवला असता तर फार चांगले झाले असते; परंतु आपण दावा करतानाच दाव्यामध्ये एक वेगळा अर्ज करून ही रक्‍कम मे. न्यायालयामध्ये भरू शकता.

आपण करत असलेला दावा हा मुदतीत असल्याबाबत मे. उच्च व सर्वोच्च न्यालयाचे निवाडे आहेत. आपण दावा दाखल करताना आपण मिळकत खरेदी देणारा प्रतिवादी यांचेविरुद्ध या मिळकतीचे मालकाने अन्य कुणालाही मिळकत विकत देऊ नये व त्रयस्थ व्यक्‍तीबरोबर व्यवहार करू नये. यासाठी मनाईचा अर्ज करून मे. न्यायालयाकडून अंतरिम हुकूम मिळवू शकता व ही मनाई संपूर्ण दाव्याचा निकाल लागेपर्यंत मागू शकता. मे. न्यायालय आपला हा दावा गुणदोषावर निकाल व हुकूमनामा देऊन आपले बाजूने निकाल देईल. त्यानंतर जर जमीन मालकाने या निर्णयाविरुद्ध अपील केले नाही तर आपण या दाव्यातील हुकूमनाम्याची दरखास्त करून जमीन मालकाकडून खरेदीखत करून घेऊ शकता जर जमीन मालकाने एवढे होऊनसुद्धा आपणास खरेदीखत व ताबा देण्यास टाळाटाळ व दिरंगाई केली तर आपण कोर्ट कमिशनरकडून या जागेचे खरेदीखत व ताबा मिळवू शकता.

प्रश्‍न क्र. 2 – आमची वडिलोपार्जित इस्टेट असून त्यामध्ये जवळजवळ 10 लोक मालक आहेत. मला माझी हिश्‍याची जागा वेगळी काढून ती मला वापरावयाची आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल?
उत्तर – आपली जमीन वेगळी करून मागण्याचा हक्‍क कायद्याने आपणांस दिला आहे. यासाठी आपण सर्व मालकांना नोटीस देऊन आपल्याला आपला हिस्सा ठरविण्यासाठी नोटीस द्यावी व त्यामुळे सरसनिरस वाटप करण्याबाबत कळवावे. जर आपल्याबरोबर असलेल्या मालकांनी याबाबत नकार दिला तर आपल्याला रितसर या मिळकतीचे सरसनिरस वाटप करावा लागेल. या दाव्यामध्ये आपल्याला सदर जागेचे वर्णन म्हणजेच क्षेत्रफळ चतु:सीमा इ. मांडाव्या लागतील. तसेच या दाव्यात आपल्याला आपले वंशवेल दाखवावी लागेल व कुळाचे वारसाला किती हिस्सा मिळेल याबाबतीत वर्णन करावे लागेल. यासाठी तुम्ही नियोजित वाटपाचा नकाशासुद्धा देऊ शकता. इस्टेट सरसनिरस वाटप करून हवी आहे अशी विनंती व मागणी करावी लागेल. या दाव्यामध्ये प्रथम आपणांस प्राथमिक हुकूमनामा मिळेल व मग आपण कायमचा हुकूमनामा मिळण्यासाठी वेगळा फायनल डिक्रीसाठी अर्ज करावा लागेल. आपणांस कायमचा हुकूमनामा मिळाल्यानंतर आपण दरखास्त करून आपल्याला ही मिळकत आपल्या हिश्‍श्‍याप्रमाणे मिळू शकेल. अशा प्रकारच्या दाव्यामध्ये सर्व पक्षकार हे वादी आणि प्रतिवादी असतात.

प्रश्‍न क्र. 3 – आमची पुण्यामध्ये एक मिळकत असून त्यामध्ये 2 खोल्यांमध्ये एक भाडेकरू त्यांचे कुटुंबीयांसह राहात आहे. आम्ही घरमालक असून आमचे वरील कुटुंब आहे व आम्हांस आमचे ताब्यातील असलेली जागा अपुरी पडत आहे. उलटपक्षी आमचा भाडेकरू सरकारी नोकरीत असून तो दुसरीकडे जागा घेऊन राहू शकतो. आम्ही या भाडेकऱ्यास खोल्यांचा ताबा मागूनसुद्धा तो त्यांची भाडेकरू म्हणून असलेल्या जागेचा ताबा देण्यास स्पष्टपणे नकार देत आहे तर आम्ही या भाड्याचे खोलीचा ताबा कसा घ्यावा? आमचे भाडेकरू निकालानंतर सुद्धा ताबा न देण्याची शक्‍यता आहे.
उत्तर – आपल्या प्रश्‍नामध्ये आलेल्या माहितीनुसार आपणास असलेली जागेची गरज ही प्रामाणिक आहे. आपण महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार आपली जागा ताब्यात मिळण्यासाठी मे. लघुवाद न्यायालयामध्ये रितसर दावा करावा व तुमचे जागेची गरज पुराव्यासह सिद्ध करावी. आपल्या केसमध्ये कायदा व अशा प्रकारच्या दाव्याबाबतचे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निकाल आपल्या बाजूने असल्याने आपणांस निश्‍चितपणे उपयोगात येतील. याबाबत शंका नाही. आपणांस हा जागेच्या ताब्याबाबत हुकूमनामा मिळाल्यानंतर आपण या निकालाचे अंमलबजावणी मे. न्यायालयाकडून घेऊ शकता असे करण्यासाठी आपणांस मे. न्यायालयातील शिपाई (बेलिफ) ती अंमलबजावणी करतील. जर आपल्या भाडेकरूने ताबा घेताना काही हरकती घेतल्या तर आपल्याला पोलिसांची मदत घेऊन भाडेकरूचे सामान जप्त करूनसुद्धा ताबा घेता येईल व आपल्याला मिळालेल्या हुकूम ताब्याची अंमलबजावणी करता येईल. तसेच या दाव्यामध्ये जर आपले भाडेकरूला असलेले भाडे अल्प आहे असे दाखवून दर महिन्याचे उत्पन्न मागता येईल. म्हणजे आपली मिळकत असलेल्या भागात बाजारभावाप्रमाणे चालू असलेल्या भाड्याचे रकमेची मागणी करून त्यासाठी वेगळा हुकूम याच दाव्यामध्ये मे. न्यायालयात मिळवू शकता. सध्याच्या काळात अशा प्रकारचे दावे मे. न्यायालयात कमी येत असल्यामुळे आपणांस एक ते दोन वर्षांत या दाव्याचा निकाल मिळू शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.