कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – मी एक स्त्री असून मी माझ्या कुटुंबीयांसह पुण्यात राहात आहे. मी एका बिल्डरकडे सदनिका विकत घेण्यासाठी लेखी करार केला होता व तो मी नोंदविलादेखील होता. या करारात नमूद केल्याप्रमाणे किंमत रक्कम रु. 57,00,000/- (अक्षरी रु. सत्तावन्न लाख फक्त) अशी ठरली होती व त्यासाठी रु. 15,00,000/- (अक्षरी रु. पंधरा लाख फक्त) माझ्या बचतीतून दिले होते. त्यानंतर मला या बिल्डरने पत्र पाठविले आणि हा प्रकल्प सुधारित झाल्याचे कळविले. आणि माझ्या सदनिकेची किंमत रक्कम रु. 66,00,000/- (अक्षरी रु. सहासष्ठ लाख फक्त) होणार आहे असे कळविले म्हणून मी ही सदनिका खरेदी करण्याचे रद्द केले, त्यावेळेस त्या बिल्डरने माझे बुकिंग रद्द करण्यास मान्यता दिली. परंतु या बिल्डरने माझी भरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तर मला माझी रक्कम मिळण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर – भारत सरकारने नुकताच दोन वर्षांपूर्वी रेरा ऍक्‍ट 2017 (रिअल इस्टेट रेग्लुलेशन ऍण्ड डेव्हलपमेंट ऍक्‍ट 2017) हा अमलात आणला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार आपण या बिल्डरच्या विरुद्ध दि महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथोरिटी मुंबई यांचेकडे फिर्याद दाखल करावी. त्यानंतर सदरची ऍथोरिटी बिल्डरला नोटीस पाठवेल, त्यानंतर सदर कायद्यातील कलम 7 प्रमाणे याबाबत या कायद्यातील तरतुदीनुसार त्वरित या फिर्यादीची चौकशी करेल व त्यामध्ये अशा रीतीने जर अनुचित व्यापार पद्धती (Infair trade practice) चा वापर केला आहे असे निदर्शनास आले तर सदरची ऍथोरिटी आपण गुंतविलेली रक्‍कम आपणास व्याजासकट परत मिळण्याचा हुकूम तसेच या फिर्यादीचा खर्चसुद्धा मिळेल. या वादाबाबत आपण दिवाणी न्यायालयात जाऊन दावा करून आपली रक्कम परत मिळवू शकता किंवा आपण ग्राहक स्वसंरक्षण कायदा 1986 प्रमाणे फिर्याद करू शकता व आपण सदनिकेमध्ये गुंतविलेली रक्कम परत मिळवू शकता, परंतु, आपण जर रेरा ऍक्‍टप्रमाणे फिर्याद दिली तर त्याचा निकाल लवकर लागतो. म्हणून शक्‍यतो आपण आपली फिर्याद रेरा ऍक्‍ट नुसार करावी. त्याचप्रमाणे या बिल्डरचे विरुद्ध इंडियन पिनल कोड कलम 406 व 420 प्रमाणे पोलिसांकडे फिर्याद करू शकता.

प्रश्‍न क्र. 2 – मी पुण्यामध्ये अप्पर कोंढवा रोड या ठिकाणी राहात आहे. मी सन 1961 मध्ये शनिवार पेठ, फुटका बुरूज येथे राहात होतो. त्यावेळेस माझे आई-वडिलांची जागा पुरात वाहून गेली. 1961 सालामध्ये माझे वडिलांनी खटपट करून त्यावेळेस माझे मयत आईस शिवदर्शन येथे पूरग्रस्त म्हणून जागा मिळाली, माझे आईचा मृत्यू सन 1966 मध्ये झाला. त्यावेळेस माझ्या आईचा सख्खा भाऊ सन 1989 मध्ये आमचे शिवदर्शन येथे त्यांचे कुटुंबीयांसह राहण्यास आला. त्यावेळेस माझा मामा वरील शिवदर्शन जागेची सर्व कामे करून लागला. परंतु, माझे आईचे निधनानंतर माझे कुटुंबीयांसह विनाकारण भांडणे करू लागला, त्यामुळे मी व आमचे भाऊ सन 1993 मध्ये बिबवेवाडी या ठिकाणी राहण्यास गेलो. सन 1993 मध्ये माझे मामीने गैरमार्गाने या शिवदर्शन जागेवर स्वतःचे नाव लावले. त्यानंतर 2017 मध्ये माझे मामीने ही जागा त्रयस्थ व्यक्तीस विकली म्हणून मी या जागेची कागदपत्रे काढली, आता मला या जागेच्या संदर्भात माझे कायदेशीर हक्क व अधिकारासाठी काही करता येईल का?
उत्तर – आपल्या प्रश्‍नामधून प्रथमतः हे निष्पन्न होत आहे की, आपण या जागेच्या मालकी वहिवाटीबाबत खूपच गाफील राहिला आहात. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे. परंतु कायद्याने आपणास या जागेच्या मालकी वहिवाटीबाबत मे. न्यायालयात जाऊन आपली जागा ताब्यासह मिळण्यासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. कारण कायद्याने मालकीबाबतचा दावा करण्यास कुठलेही मुदतीची बाधा येणार नाही असे मला वाटते. त्यासाठी तुम्ही प्रथमतः तुमचे मामीला व तुमचे जागा विकत घेणाऱ्या इसमास कुठल्याही वकिलांमार्फत नोटीस देऊन तुमची वरील जागेमध्ये तुमचे कायदेशीर हक्क व अधिकार असल्याबाबत कळवावे व त्यानंतर तुमचे नोटिसीची दखल तुमचे मामीने व ही मिळकत घेणाऱ्या इसमाने न घेतल्यास तुम्ही कोर्टामध्ये मालकीबाबतचा दावा करावा व त्यामध्ये तुम्ही या जागेचे मालक असल्याचे मे. न्यायालयाकडून ठरवून घ्यावे. तुम्ही या दाव्यात तुमचे जागेचे मालकीबरोबर ताब्याची मागणी करावी, त्यापूर्वी तुम्ही या जागेच्या मा. जिल्हा अधिकारी, पानशेत पूरग्रस्ताच्या अडीअडचणीचे विभागाकडे चौकशी करून कागदपत्रे काढावीत व ती वकिलांना दाखवून मगच याबाबतचा दावा दिवाणी कोर्टामध्ये करावा.

प्रश्‍न क्र. 3 – मी एक विवाहित स्त्री असून तीन अपत्ये आहेत. माझा पती पी.एम.टी.मध्ये नोकरी करीत आहे. माझे पती हे बाहेरख्याली आहेत व आतातर त्यांनी एक विवाहित बाईस आपल्या प्रेमात ओढले असून ते आता दुसरीकडे खोली घेऊन राहात आहेत. त्यांनी त्यांची व माझी मुले यांना शिक्षणासाठी म्हणून दूर ठेवले आहे. मला उत्पन्नाचे साधन नाही. याशिवाय माझ्या पतीने ज्या बाईस प्रेमप्रकरणामध्ये ओढले आहे तिचा पती मला व माझ्या आईस दररोज भेटून त्यांची बायको कोठे आहे याची विचारणा करीत आहे व आम्हास त्रास देत आहे. तर मला आता माझे पतीकडून पोटगी मिळण्यासाठी काय करावे लागेल? आम्हाला तो माणूस या प्रकरणामध्ये त्रास देत आहे व त्याबाबतीत काय करावे लागेल?
उत्तर – नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला पतीचे पगारातील रकमेचा 30 टक्के भाग म्हणून पोटगी मिळू शकते असा निर्णय दिला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पतीला नोटीस पाठवून दरमहा रक्कम रु. 15,000/- देण्याबाबत कळवावे आणि नोटीस देऊन देखील तुमचे पतीने पोटगी दिली नाही तर तुम्ही रितसर पती व्यभिचारी आहे या कारणास्तव मे. कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज करावा व या अर्जातच पोटगीसाठी हिंदू विवाह कायदा कलम 24 प्रमाणे दरमहा रक्कम रु. 15,000/- पोटगी मिळण्यासाठी अर्ज करावा. म्हणजे तुम्हाला पतीकडून पोटगी रक्कम रु. 15,000/- पोटगी देण्याचा मे. न्यायालय हुकूम करेल व आता जो माणूस त्यांच्या बायकोची विचारणा करीत आहे त्याचेविरुद्ध तुम्ही राहात असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज करावा म्हणजे पोलीस या इसमास असे तुम्हास त्रास न देण्याबाबत ताकीद देतील.

Leave A Reply

Your email address will not be published.