कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – आमचे गणेश पेठ या ठिकाणी एक जुनी वडिलार्जित मिळकत असून त्यामध्ये सध्या आमचे चार भावांची मालकी आहे. सदर मिळकतीमध्ये एक देऊळ असून या मिळकतीमध्ये आमचेकडे एक 10 फूट बाय 10 फूट खोलीचा ताबा होता. प्रत्यक्षात या मिळकतीचे क्षेत्रफळ 1000 स्क्वे. फूट असून त्यामध्ये माझा 25% हिस्सा असल्याने मला या मिळकतीमधील 250 स्क्वे. फुटाची मालकी आहे. आमचे इतर तीन भावांनी ही मिळकत विकसित करण्यासाठी एका बिल्डरबरोबर दहा वर्षांपूर्वी वेगवेगळा करार केला. परंतु, या बिल्डरने माझेबरोबर कुठलाही करार केलेला नाही. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता तो नुसते करू असे आश्‍वासन देत आहे. या बिल्डरने दहा वर्षांपूर्वी माझेकडून गोड बोलून माझे खोलीचा ताबा घेतला व त्यानंतर ही मिळकत पूर्णपणे पाडून टाकली. मी आर्थिक परिस्थितीमुळे व उगाच घरातील भावाबरोबर वाद नको म्हणून कुठेही याबाबतीत दाद मागितली नाही. आता माझे वय 75 वर्षांचे असून मला या मिळकतीबाबत माझे वारसांना भविष्यामध्ये त्रास होऊ नये अशी इच्छा आहे. तरी हा प्रश्‍न मी कसा सोडवू?
उत्तर – आपल्या प्रश्‍नातून आलेल्या माहितीनुसार आपल्यावर खरोखरच अन्याय झाला आहे असे दिसते. त्यामुुळे हा प्रश्‍न आपण लवकरात लवकर सोडविणे व्यावहारिक व कायद्याने आवश्‍यक झाले आहे. आता जर तो बिल्डर आपल्याशी याबाबतीत तडजोड करत नसेल तर तुम्ही या बिल्डरला नोटीस देऊन या मिळकतीतील झालेल्या व्यवहाराबाबत व तुमचे हिश्‍श्‍यास आलेल्या/ पाडलेल्या भागाबाबत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा करावी व खुलासा मागवावा व या बिल्डरला तुमचेबरोबर ताबडतोब करार करण्याची सूचना द्यावी. याबाबतीत जर या बिल्डरने जर दखल घेतली नाही तर तुम्हास या बिल्डरविरुद्ध वकिलांचे सल्ल्याने व पोलीस खात्याच्या सल्ल्याने न्याय मिळवता येऊ शकेल.

प्रश्‍न क्र. 2 – धनादेश स्वीकारणाऱ्या व्यक्‍तीने कुठली खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.?
उत्तर – धनादेश स्वीकारणाऱ्या इसमाने पुढीलप्रमाणे खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
– धनादेश घेताना तो पूर्णपणे व्यवस्थित भरलेला आहे का, ते तपासून पाहा. त्यावर संस्थेचा स्टॅम्प अथवा धनादेश देणाऱ्या इसमाचे नाव प्रिंट केले आहे का हे तपासून पहा.
– धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीने त्याच्याच खात्यातून तो दिला आहे का याची खात्री करून घ्या.
– शक्‍यतो धनादेश पूर्णपणे देणाऱ्या व्यक्‍तींच्या हस्ताक्षरात लिहून घ्या.
– खोटा आर्थिक व्यवहार करताना धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीची सही त्याच्या बॅंकेकडून तपासून घ्या.
– धनादेश घेताना तो कुठल्या व्यवहारापोटी घेतला आहे, त्यासंबंधी पुरावा म्हणून वचनचिठ्ठी, करार, खरेदी विक्री बॅंक चलन इ.वर देखील धनादेश देणाऱ्या इसमाची सही घ्या.
– कायदेशीर येण्यापोटी धनादेश घ्या.
– धनादेश घेताना त्या व्यक्‍तीचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र, रेशनकार्ड अथवा पत्त्याबाबत पुरावा म्हणून घ्या.
– बॅंकांनी/वित्त संस्थांनी कर्जवाटप केल्यानंतर हप्त्याचे धनादेश घ्या व त्याबाबत स्पष्ट उल्लेख कर्जाच्या करारात करा.
– बिगर नावाचे, बिगर तारखेचे बिगर रकमेचे धनादेश शक्‍यतो घेण्याचे टाळा.
– धनादेश घेतल्यानंतर त्या व्यवहाराची नोंद हिशेबाच्या वहीमध्ये घ्या.
– धनादेश घेतल्यानंतर देणाऱ्या व्यक्‍तीकडून येणे असलेल्या रकमेचा तपशील आयकर विवरणपत्रामध्ये करा.
– धनादेश न वटता परत आल्यास 1 महिन्याचे आतमध्ये धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीस येणे असलेल्या रकमेच्या तपशील आयकर विवरणपत्रामध्ये करा.
– धनादेश न वटता परत आल्यास 1 महिन्याचे आतमध्ये धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीस नोटीस पाठवून रकमेची मागणी करून रक्‍कम 15 दिवसांत आणून देण्याचे कळवा.
– वरील नोटीस पाठविताना नोटीस दिल्याबाबत पोहोचल्याची पावती नोटीस घेतल्याची पोहोच पावती जपून ठेवा.
– नोटीस मुदतीत रक्‍कम न मिळाल्यास असा धनादेश न वटविणाऱ्या व्यक्‍तीविरुद्ध परक्राम्य लेख अधिनियम 138 अन्वये दंडाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल करा.
– धनादेश न वटता परत आल्यास त्या तारखेपासून 3 वर्षांचे आतमध्ये दिवाणी न्यायालयात रक्कम वसुलीचा दावा लावा.
– धनादेशाची वैधता 3 महिने असल्यामुळे धनादेशाचे तारखेपासून 3 महिन्यांचे आत तो बॅंकेमध्ये वटविण्यासाठी भरा.
– धनादेशाची रक्कम मोठी असल्यास व धनादेश देणाऱ्या इसमाने अशाप्रकारे इतरही खोटे न वटलेले धनादेश दिले असल्यास अशा व्यक्‍तीविरुद्ध इं.पि. कोड कलम 406 व 420 प्रमाणे पोलिसात तक्रार द्या. अथवा दंडाधिकाऱ्याकडे खासगी फिर्याद दाखल करा. धनादेशाच्या बाबतीत फिर्याद ही पूर्णपणे लेखी पुराव्यावर आधारित असल्यामुळे वरील खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

प्रश्‍न क्र. 3 – माझा 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. सुरुवातीला माझे पतीने मला चांगली वागणूक दिली. परंतु, त्यानंतर तो मला हुंडा व बक्षीस मिळाले नाही. या कारणास्तव भांडणे करू लागला व त्याने मला 4 ते 5 वेळा काठीने देखील मारले. तसेच मी त्याच्याबरोबर राहात असताना त्याने माझी खाण्याची आबाळ केली. मला या लग्नसंबंधातून 2 अपत्ये झाली व त्यांची वये आता 7 व 5 अशी आहेत. माझे पतीने त्यांचे चुलत विधवा बहिणीबरोबर प्रेमसंबंध जुळवले व आता त्याने मला नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांचे घरातून मुलांसह हाकलून दिले. म्हणून मला नाईलाजाने माझे आईकडे राहण्यास यावे लागले. सुमारे 15 दिवसांपूर्वी तो माझे आईचे घरी आला व त्याने बळजबरीने भांडणे करून माझे दोन्ही मुलास त्याच्याकडे राहण्यास घेऊन गला. तरी याबाबत मी कुठली कारवाई करावी?
उत्तर – आपले प्रश्‍नामधून दिलेली माहितीवरून आपले पतीने इंडियन पिनल कोड कलम 494, 497 व 498 प्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज करावा म्हणजे या केसबाबत पोलीस दखल घेतील व तुमचे पतीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. जर पोलिसांनी याबाबत कारवाईस करण्याचे टाळले तर तुम्ही याबाबत मे. न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल करू शकता. तसेच आपण याप्रकरणी कुठल्याही वकिलाकडे जाऊन आपले पतीकडून पोटगीबाबत नोटीस पाठवावी व त्यांचेकडे पोटगीची मागणी करावी. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे मुलांचा ताबा हवा असल्यास त्याबाबत वेगळा अर्ज तुम्हाला मे. न्यायालयामध्ये करता येईल व शेवटी तुम्ही पतीविरुद्ध दुसरे लग्न केले म्हणून व तुमचा पतीने छळ केला म्हणून, मे. न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.