तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग त्वरित काढावे म्हणून यंत्रणा कार्यरत केली असून हे काम करताना कोणीही अडथळा निर्माण केल्यास त्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करावा, असा सूचनावजा आदेश मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी होर्डिंग काढण्याचे काम करणाऱ्या संबंधितांना दिला.
घाटकोपर येथील घडलेल्या होर्डिंग पडण्याच्या दुर्घटनेनंतर शासनाचे आदेशान्वये तळेगाव हद्दीतील २७ अनाधिकृत होर्डिंग काढण्याची सुरुवात बुधवारी (दि. २२) मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करताना मुख्याधिकारी पाटील बोलत होते.
या वेळी नगररचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक गणेश कोकाटे, विरेंद्र नार्गुंडे, जयंत मदने, सिद्धेश्वर महाजन, माजी सभापती महेश फलके, शेखर मुऱ्हे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील म्हणाले की, ज्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग आहेत. त्या मालकांकडून होर्डिंग काढण्याचा खर्च घ्यावा. त्यांनी खर्च दिला नाही तर त्याच्या मालमत्ता करातून तो वसूल करावा, किंवा त्याचे पाणी जोड बंद करावे. होर्डिंग काढल्यानंतर स्ट्रक्चरसाठी वापरलेले स्टील नगर परिषदेमध्ये जमा करावे.
तसेच जर कोणाला नव्याने होर्डिंग लावायचे असेल तर नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी. ते लावण्याच्या सर्व नियम, अटी पूर्ण कराव्यात. तसेच कोणी अनधिकृत स्ट्रक्चर काढताना अडथळा तर त्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
तळेगावातील एकूण २७ अनाधिकृत होर्डिंग काढण्यासाठी चार पथकांद्वारे कार्य करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर हे काम पूर्ण होणार आहे. – एन. के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद.