#CWC19 : विडींजविरूद्ध खरी परीक्षा- चहल

मॅंचेस्टर – पाकिस्तान व ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघांना आम्ही पराभूत केले असले तरी वेस्ट इंडिजविरूद्ध आमची खरी परिक्षा आहे असे भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने सांगितले.

चहल म्हणाला की, आयपीएल स्पर्धेत विडींजचे बरेचसे खेळाडू खेळत असतात. त्यांच्या शैलीचा आम्हाला बारकाईने अभ्यास करण्याची मिळत असली तरी आयपीएल व विश्‍वचषक स्पर्धा यात खूप फरक आहे. आयपीएलमध्ये ते देशाकरिता खेळत असतात. तेथे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. विश्‍वचषक स्पर्धेत देशासाठी खेळत असल्यामुळे ते गांभीर्याने व सांघिक वृत्तीने खेळतात. न्यूझीलंडविरूद्ध कार्लोस ब्रेथवेट याने दिलेली लढत आमच्यासाठी धोक्‍याची घंटाच आहे. संघास त्याने एकतर्फी पराभवाच्या छायेतून विजयाच्या जवळ नेले होते. त्यांचा विजय थोडक्‍यात हुकला होता. या सामन्यात जरी न्यूझीलंडने विजय मिळविला तरी प्रेक्षकांची मने ब्रेथवेट याने जिंकली होती.

चहल या लेगस्पीनरने आतापर्यंत या स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये भाग घेतला असून त्यामध्ये त्याने सात विकेट्‌स घेतल्या आहेत. तो म्हणाला की, उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी वेस्ट इंडिजला उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय मिळविणे अनिवार्य आहे. हे लक्षात घेतले तर आमच्याविरूद्ध ते सर्वोत्तम कौशल्य दाखविण्यासाठी प्रयत्न करतील. साहजिकच आम्हालाही ही लढत म्हणजे सत्वपरिक्षा आहे. शेवटपर्यंत चिवट झुंज देण्यासाठी आम्हाला डावपेचांचे नियोजन करावे लागणार आहे.

अफगाणिस्तानविरूद्धच्या लढतीबाबत चहल याने सांगितले की, या सामन्यात आमची फलंदाजी अपेक्षेइतकी झाली नाही. त्यांच्या गोलंदाजांकडे अचूक मारा करण्याची क्षमता आहे याची आम्हाला कल्पना होती. त्यातच खेळपट्टेवर फटके मारणे जड जात होते. त्यामुळेच आम्ही 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, आम्हाला हे ध्येय साकार करता आले नाही. केदार जाधव याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याने एका बाजूने अर्धशतक करताना दाखविलेला संयम अतुलनीय आहे.

विडींजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्ध खेळू शकला नव्हता. त्याच्याविषयी चहल म्हणाला, रसेल हा नेहमीच धोकादायक फलंदाज मानला जातो. चार फलंदाज बाद झाल्यानंतर तो खेळावयास येतो. सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्याबाबत तो चतुर फलंदाज आहे. रसेल हा उत्तम उपयुक्त गोलंदाजही आहे. त्याच्यावर वेस्ट इंडिजची मोठी जबाबदारी असणार आहे. भारत व वेस्ट इंडिज यांच्यात 27 जून रोजी सामना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.