सेंट जॉन : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने आता अजब दावा केला आहे. मेहुल चोक्सी म्हणाला, मी कायदे मानणारा व्यक्ती आहे. मी भारतातून पळून गेलेलो नाही. मी उपचारासाठी देश सोडला आहे.
मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.
मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक झाली आहे. त्यानंतर चोक्सीने डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्जही दाखल केला आहे. मात्र, न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे भारतानेही मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशी प्रक्रियेला वेग दिला आहे.
डोमिनिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात प्रतिज्ञापत्रात मेहुल चोक्सी याने म्हटलं आहे, मी भारतीय अधिकाऱ्यांना माझी भेट घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे. तसेच त्यांनी माझ्यावरील आरोपांवर माझी कोणतीही मुद्द्यावर चौकशी करावी. मी भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही. मी उपचारासाठी भारतातून अमेरिकेला गेलो तेव्हा माझ्याविरोधात कोणत्याही तपास संस्थेचं वॉरंट नव्हतं.
देशात PNB घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मेहुल चोक्सीचं नाव चर्चेत आलं. याच काळात चोक्सी भारत सोडून गेला. आरोपांआधीच चोक्सीने भारतातून पळण्याची तयारी केल्याचाही आरोप झालाय. 2017 मध्ये चोक्सीने एंटीगा अँड बारबुडाचं नागरिकत्व घेतलं होतं.
दरम्यान, मेहुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. एंटीगा आणि बारबुदाचे पोलीस प्रमुख एटली रॉडने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, अपहरणाचा दावा केवळ मेहुल चोक्सीचे वकीलच करत आहेत. पोलिसांकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत. डोमिनिका पुोलिसांनी या अपहरणाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. चोक्सीला डोमिनिका नेण्यात एंटीगा पोलिसांचा कोणताही सहभाग नाही.