बैरुत, (लेबेनॉन): लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अमोनियम नायाट्रेटच्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभुमीवर लेबेनॉनच्य माहिती मंत्री मनाल अब्देल समाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या अत्यंत भीषण स्फोटामध्ये अंदाजे 150 जण ठार झाले होते. तर शहरातील कित्येक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
लेबेनॉनच्या नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आपल्याला अपयश आल्याने आपण नागरिकांची माफी मागत आहोत आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, असे मनाल अब्देल समाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
माहिती मंत्री महिलेने जरी राजीनामा दिला असला तरी या भीषण स्फोट प्रकरणी संपूर्ण सरकारनेच पायउतार व्हायला पाहिजे, अशी मागणी लेबेनॉनमधील मारोनाईट चर्चने केली आहे. ही घटना इतकी भयंकर होती की त्यातून सरकारी यंत्रणा किती पोखरलेली, सडलेली आहे, हेच स्पष्ट होत असल्याचे चर्चने म्हटले आहे.
या स्फोटानंतर राजधानीमध्ये सरकारविरोधात जनक्षोभ उसळला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सरकारविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. काही मंत्र्यांच्या निवासाच्या दिशेने काढण्यात आलेल्या या मोर्च्याला हिंसक वळण लागले.
मारोनाईट चर्चचे नेते बेशरा राय यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले आणि पंतप्रधान हसन डायब यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची घोषणा केली. लेबेनॉनमध्ये गेल्या ऑक्टोबरपासून मुदतपूर्व निवडणूकांची मागणी होत आहे. या मागणीचा पुनरुच्चारही राय यांनी निदर्शनांदरम्यान केला.