Lebanon Pager Blast । लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागात पेजरने काल कहर केला. बीपिंगच्या आवाजासह स्फोटांमुळे सर्वत्र गोंधळ उडाला. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, लेबनॉनमध्ये 11 लोकांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 4000 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटांमध्ये हिजबुल्लाहच्या ५०० हून अधिक सदस्यांना आपले डोळे गमवावे लागले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लेबनॉन आणि सीरियातील हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेचे सैनिक आणि सदस्य गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यापासून पेजर वापरत होते. इस्रायली सैन्य IDF आणि गुप्तचर संस्था मोसादच्या रडारपासून बचाव करण्यासाठी, हिजबुल्लाचे सदस्य पेजर वापरत होते जेणेकरून त्यांचे स्थान ट्रॅक होऊ नये.
हल्ला किती भीषण होता? Lebanon Pager Blast ।
लेबनॉन आणि सीरियामध्ये फुटलेले पेजर. स्फोटापूर्वी काही सेकंदांसाठी बीपचा आवाज ऐकू आला. काही पेजरच्या खिशात स्फोट झाला तर काहींनी बीपचा आवाज ऐकून खिशातून किंवा पिशवीतून पेजर काढताच ब्लास्ट झाला. अनेक पेजर लोकांच्या हातात फुटले.
या स्फोटात एका लहान मुलीसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे 4000 लोक गंभीर किंवा मध्यम जखमी झाले आहेत. अनेकांचे हात-पाय निकामी झाले. 500 हून अधिक लोकांचे डोळे गेले.
इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी यांना एक डोळा गमवावा लागला तर दुसरा डोळा खराब झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लेबनीज खासदारांची मुले आणि बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या हिजबुल्लाहच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे.
मोसादने हल्ला कसा केला? Lebanon Pager Blast ।
एका इंग्रजी वर्तमापत्राच्या अहवालानुसार, मोसादच्या हिजबुल्लाहविरुद्धच्या गुप्तचर कारवाईचा भाग म्हणून इस्रायलने या पेजर्समध्ये स्फोटके बसवली होती. हिजबुल्लाहने गोल्ड अपोलो नावाच्या तैवानच्या कंपनीकडून सुमारे 3000 पेजर मागवले होते. पण हे पेजर लेबनॉनला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली. हे पेजर या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान तैवानहून लेबनॉनला पाठवण्यात आले होते. या हल्ल्याचा कट काही महिन्यांपूर्वीच रचला गेल्याचे दिसते.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पेजर एका तैवानच्या कंपनीच्या AP924 मॉडेलचे होते. तैवानहून लेबनॉनला पाठवलेल्या पेजरच्या बॅचमध्ये प्रत्येक पेजरला एक ते दोन औंस स्फोटके जोडलेली होती. हे स्फोटक पेजरमध्ये बसवलेल्या बॅटरीशेजारी पेरण्यात आले होते.
रिपोर्टनुसार, लेबनॉनमध्ये दुपारी 3.30 वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. या संदेशामुळे पेजरमध्ये बसवलेले स्फोटक सक्रिय झाले.
पेजर उपकरणांमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही सेकंद बीपिंगचा आवाज ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसादने पेजरच्या आत एक लहान बोर्ड टोचला होता, ज्यामध्ये स्फोटके होते. हे स्फोटक कोणत्याही उपकरणाने किंवा स्कॅनरने शोधणे अत्यंत अवघड आहे.
मोसादने पेजरमध्ये PETN स्फोटक पेरले होते
अरेबियाच्या वृत्तानुसार, ‘इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हिजबुल्लाहच्या पेजरमध्ये पीईटीएन बसवले होते. हा प्रत्यक्षात एक प्रकारचा स्फोटक आहे, जो पेजर बॅटरीवर वापरला जात होता. बॅटरीचे तापमान वाढल्याने या पेजर्सचा स्फोट झाला. या स्फोटकाचे वजन 20 ग्रॅमपेक्षा कमी होते.’