पिंपरी -निवडणुका आल्या की या पक्षांतून त्या पक्षात जाण्याचा प्रकार होतो. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे पक्ष सोडून गेले हे त्यांचे दुर्देव आहे. ज्या पक्षामध्ये नेता म्हणून त्यांना संधी मिळाली, त्या पक्षाशी गद्दारी करून दुसरीकडे चाकरी करण्यासाठी ते गेले असल्याची टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यावर भोसरी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार बारणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारणे म्हणाले, अनेकांना वाटते की गजानन चिंचवडे माझ्या जवळचा आहेत.
मात्र मी त्याला पक्षात घेण्याचे काम केले होते. पक्षाने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सचिन भोसले यांना देखील मी पक्षामध्ये घेतले. आज ते शहरप्रमुख म्हणून चांगली जबाबदारी पार पाडत आहेत. काम करत असताना एखादा चांगला कार्यकर्ता असेल त्याला पक्षात घेण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, गजानन चिंचवडे यांना चांगला कार्यकर्ता समजून मी पक्षात घेतले ही माझी चूक झाल्याचे बारणे यावेळी म्हणाले.
जी माणसे पदासाठी दुसऱ्या पक्षात जातात त्यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे, असे मी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. मात्र निर्णय घेण्यापूर्वीच ही मंडळी पक्ष सोडून गेल्याचेही बारणे यांनी यावेळी सांगितले.