पिंपरी -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामांना गती दिली असून प्रभाग निश्चितीनंतर आता आरक्षणांची सोडत काढली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार मंगळवार (दि. 31 मे) रोजी हे आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 13 मार्च 2022 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकराज सुरू आहे. सुरुवातीला करोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, 4 मे आणि त्यानंतर 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे निवडणुकीबाबत आदेश दिल्यामुळे पाऊस कमी असलेल्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
13 मे रोजी निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली होती. त्यानंतर महापालिका निवडणूक विभागास मतदार याद्या निश्चिती तसेच मतदान यंत्रे दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरीता आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याबाबतची नोटीस शुक्रवार (दि. 27 मे) रोजी प्रसिद्ध करण्यात यावी.
मंगळवार दि. 31 मे रोजी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरीता आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढण्यात यावी. तर 1 जून रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करावे. त्यानंतर 1 ते 6 जून या कालावधीत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी कालावधी देण्यात आला असून, 13 जून रोजी आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर करण्यात यावे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या तारखा
आरक्षणाची नोटीस प्रसिद्ध करणे -27 मे 2022
जागा निश्चितीकरीता आरक्षण सोडत -31 मे 2022
प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणे – 1 जून 2022
आरक्षणावर हकरती व सूचना मागविणे – 1 ते 6 जून 2022
हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण जाहीर करणे – 13 जून 2022