श्रेय लाटण्याचा बालहट्ट सोडा – सौंदणकर

निगडी उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई लेन सुरू करण्याची मागणी

पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोरील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, आपल्या नेत्याच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्याच्या नादात हे उद्‌घाटन रखडले आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हा बालहट्ट सोडावा आणि उड्डाणपुलाची पुणे-मुंबई लेन सुरु करावा, अशी मागणी विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

निगडी येथील या उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई वाहतुकीसाठीच्या लेनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तरीदेखील ही लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याची महापालिका प्रशासनाची तयारी दिसत नाही. पुलाच्या काही भागांचे काम सुरू असल्यामुळे वळसा घालून पुढे जावे लागते. यादरम्यान वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम पूर्णात्वास येत असतानाच श्रेय लाटण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून अटोकाट प्रयत्न होत आहे.

प्रदेश पातळीवरील भाजप नेत्याच्या हस्ते पुलाचे उद्‌घाटन करण्याचा बालहट्ट स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून धरला जात आहे. भाजपच्या श्रेयवादात न अडकता नागरिकांसाठी पुलाची पुणे-मुंबई लेन खुली होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनचालकांना तीन ते चार किलोमीटरचा वळसा घालून जाण्याची वेळ येणार नाही. लवकरात लवकर पुलाची पुणे-मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली करून वाहनचालकांना यंदाची दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.