मोने यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडसावले; पालिकेच्या सभेत गोंधळात 34 विषयांना मंजुरी
सातारा – गैरहजर कर्मचारी, बेजवाबदारपणे दिली जाणारी उत्तरे, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी सभेला मारलेली दांडी यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर शनिवारी झालेली सातारा नगरपालिकेची पालिकेची सर्वसाधारण सभा गोंधळ नाट्याचा अंक ठरली. “पॅंट उतारो’ आंदोलन करणाऱ्या बाळासाहेब खंदारे यांनी हात जोडत गांधीगिरी केल्याने सभागृह आश्चर्यचकित झाले.कंत्राटी तत्वावरचे चालक भरतीचा विषय स्थगित करण्यात येऊन 34 विषय मंजूर करताना नगराध्यक्ष माधवी कदम यांना शिस्तीची छडी वारंवार उगारावी लागली.
नगरसेवकांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पुणे- मुंबई सोडा, प्रशासनावर लक्ष द्या. पालिकेत असाल तर खुर्ची न उबवता कामे करा, असा तिखट सल्ला संतप्त मोने यांनी मुख्यांधिकाऱ्यांना दिला. सानुग्रह अनुदानाची तरतूद कशातून केली, शिक्षण मंडळाचे कार्यालय हलावण्याचे कारण काय, मागासवर्गीय सेस फंडाची कामे का रखडवली जातात, बजेटमध्ये तरतूद केली आहे, सूचना कशी बदलली जाते आदी मुद्यांवरून बाळासाहेब खंदारे, अशोक मोने, अण्णा लेवे, अमोल मोहिते, अविनाश कदम, विजय काटवटे, धनंजय जांभळे या सदस्यांनी प्रशासनाला टार्गेट केले. नगरपालिका सभा नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडताना प्रशासनाच्या कारभाराचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला. स्वीकृत नगरसेवकाच्या वॉर्डात चाळीस लाख रुपये खर्च टाकण्याच्या मुद्यावर आशा पंडित व सिध्दी पवार यांनी टीका केली.
काही ठराविक नगरसेवकच नगराध्यक्षांचा निधी पळवतात, असा टीकेचा सूर होता. यावेळी कोणावर अन्याय होणार नाही असे नगराध्यक्षांनी निक्षून सांगितले. तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पालिका प्रशासनाची बाजू मांडली. नगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी बाळासाहेब खंदारे यांना जास्त भावनिक होऊ नका, सभागृहात कोणी कोणत्या जातीपातीचे नसते असा सल्ला दिला. बाळू खंदारे यांनी प्रशासनाचे हात जोडत गांधीगिरी केली व गटार दुरूस्तीचा 30 लाखांचा निधी पदरात पाडून घेतला. मात्र विषयाची सूचना ऐन वेळी बदलण्यात आल्याचा आरोप खंदारे याने केल्यावर प्रचंड वाद झाला.
यावेळी उपाध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती विशाल जाधव, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, नगरसेवक मनोज शेंडे, सुहास राजेशिर्के, आशा पंडित, लीना गोरे, प्राची शहाणे, मनीषा काळोखे यांच्या उपस्थितीत तब्बल साडेचार तास झालेल्या सभेत प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा पंचनामा झाला. स्थावर जिंदगीच्या खटावकर यांना पालिका मालकीच्या गाळ्याची माहिती देता न आल्याने मोने यांनी त्यांचे वाभाडे काढले. सभेला गैरहजर असणारे आस्थापना प्रमुख अरविंद दामले यांना सभागृहाची माफी मागायला लावली. शहराच्या दैनंदिन सफाई खर्चाचे स्पष्टीकरण देण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आरोग्य निरीक्षक कायगुडे समोरच आले नाहीत. त्यांची खर्चाच्या ताळेबंदाची जुळवाजुळव सभागृहातच सुरू झाल्याने मोने पुन्हा मुख्याधिकाऱ्यांवर भडकले. काम करता का, कामाची चेष्टा करता, या शब्दांत मोने यांनी राग व्यक्त केला. खर्चाच्या नोंदी आणण्यासाठी कायगुडे गेले ते माघारी परतलेच नाही.