पुणे : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवले आहे. तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
नवनीत राणा यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा तातडीने राजीनामा द्यायला हवा. यानंतर त्यांनी राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा खोचक सल्ला चाकणकर यांनी दिला. चाकणकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत हल्लाबोल केला.
नवनीत राणा यांना अजूनही रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक समजलेला नाही. अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेची नवनीत राणा यांनी फसवणूक केली आहे. चित्रपटात तुम्हाला रिटेकची संधी असते. मात्र, अमरावतीची जनता नवनीत राणा यांना रिटेकची संधी देणार नाही, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.
नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं. pic.twitter.com/9sebS16kX4
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 8, 2021
दरम्यान नवनीत राणा यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना दिला.