शिकूनही हाताला काम नाही…

नगर – बेरोजगारीचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले आहे. रोजगार नसल्यामुळे हाताला मिळेल ते काम लोक करत आहेत. शिकले – सवरलेले लोक रोजगार नसल्यामूळे ऑटोरिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. शहरात फेरीवाले, रिक्षावाले यांची संख्या अधिक आहे. केवळ निवडणुका आल्या की, राजकीय लोकांना यांची आठवण येते.

रिक्षावाले, फेरिवाले यांचे अनेक प्रश्‍न आहेत. मात्र, हा समाज घटक दुर्लक्षित आहे. रिक्षा चालकांचे संघटन आहे. त्यांच्या युनियन आहेत. मात्र, या युनियन कुठल्यातरी राजकीय पक्षाच्याच पिल्लू असल्याचं बघायला मिळतं. तर, शहरातील फेरीवाले हे असंघटीत आहे. त्यांच्या बाजूने कोणी नाही. ना कोणी त्यांचे प्रश्‍न रेटून धरले. कशातरी पध्दतीने हे फेरीवाले आपलं आयुष्य जगतात.

अतिक्रमण होते, गर्दी होते, रस्त्यातच गाडी लावली म्हणून प्रत्येक ठिकाणाहून फेरीवाल्यांना हूसकावून लावल्या जाते. हे असे एक ना अनेक प्रश्‍न आहेत. येत्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खास त्यांच्याशी मारलेल्या ह्या गप्पा… निवडणूका, राजकारण यांकडे हे फेरीवाले कसे बघतात, शिवाय, त्यांच्या राजकीय लोकांकडून असलेल्या अपेक्षा, शिवाय त्यांचे देखिल प्रश्‍न यातून पुढे आले.

नगरमध्ये सत्ता कुणाचीही येवो, प्रश्‍न आहेत तसेच आहेत. आज कुणाला मत द्यावं, हा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा असं लक्षात येतं की, लोकप्रतिनिधी म्हणून योग्य असा उमेदवार दिसत नाही.

जनतेची नाडी ओळखणारा लोकप्रतिनिधी पाहीजे. पण दुर्दैव हे की, असा लोकप्रतिनिधी नाही. इतक्‍या वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं? साध्या मुलभूत सुविधा हे राजकारणी आजवर देवू शकले नाही. जनतेचं गाऱ्हाणं ऐकून घ्यायला कोणी तयारच नाही. प्रश्‍न सोडवल्या गेले पाहीजे. आम्ही मतदान करतोच. पण, योग्य उमेदवार नाही, ही आमची खंत आहे.
दत्तात्रय हिप्पलपिल्ले फेरीवाले

मला राजकारणातल काही कळत नाही. आमच्यासारखा सामान्य माणूस बोलला की, आम्हाला दमदाटी केली जाते. इथले राजकारणी नेते आहेत, की गुंड ?

मी कित्येक वर्षांपासून केळी विकतो. पण, आजवर कुठल्या नेत्याने फेरीवाल्यांच्या समस्या सोडवल्या नाही.
मधुकर पोटोळे फेरीवाले

बेरोजगारी वाढल्यामुळे प्रत्येकजण रिक्षा चालवून आपलं पोट भरतो. शहरात ऑटोरिक्षा चालकांची संख्या प्रचंड वाढली.

उमेदवाराने मतदारांना गाजर दाखवल्यापेक्षा मूलभूत प्रश्‍नाला प्राधान्य दिलं पाहिजे.

अभय फुलगण रिक्षा चालक

सरकारला म्हणावं, आधी रस्ते चांगले करा. गेल्या पंचवीस वर्षांत आपल्याला धड आपले रस्ते नीट करता आले नाहीत, नवल वाटतं. नगरच्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत.

दिलीप शेंदूरकर रिक्षा चालक

आज माझं वय 62 आहे. मी 40 वर्षांपासून रिक्षा चालवतो. नगर जराही बदलेले नाही. रस्ते आहेत तसेच आहेत.
आम्ही रोज या खड्ड्यातून प्रवास करतो, आम्हाला माहीत किती अवघड असतं, खड्ड्यातून रिक्षा चालवण्यामुळे अपघात होऊ शकतात.
चंद्रकात काजवे रिक्षाचालक

मी खाद्य पदार्थ विकतो. कधी या चौकात असतो, तर कधी त्या चौकात. धंदा करण्यासाठी स्वतःची जागा नाही. त्यामुळे असं फिरावं लागतं.
खुपदा महानगरपालिकेचे कर्मचारी आम्हाला हूसकावून लावतात. तरी आम्ही रोज दहा रुपयांची पावती फाडतो. रस्त्याच्या कडेला जरी स्टॉल टाकला, तरी हुसकावून लावले जाते.
शिवराम अमृत फेरीवाले

आम्ही निवडून देतो, पण कामाचं काय? नागरिक म्हणून आम्ही मतदानाचं कर्तव्य पार पाडतच आलो. आतापर्यंत.

पण, लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचा विसर पडलेला दिसतो. इथल्या समस्या लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत. इथल्या सामान्य माणसाचा आवाज त्यांना ऐकायला जात नाही.
भाऊसाहेब दूसंगी रिक्षाचालक

मी दहा वर्षांपूर्वी या शहरात आलो. गाड्यावर फिरून फळे विकतो. गाडा लावण्यासाठी मनपाची पावती फाडतो. आमच्या समस्या आहेत, त्या अजूनही तशाच आहेत.
युनूस शाह फेरीवाले

सरकारने रोजगार द्यावा. उद्योग उभारावा. जनतेचे प्रश्‍न समजून घ्यावे. विकास करावा. मात्र, आजवर इथले सत्ताधीश विकासाच्या नावावर फक्त मलिदा खात आले. पाणी नाही, रोजगार नाही, उद्योग नाही, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पण, कोणी काही करत नाही. लोकप्रतिनिधी चांगला असेल तर शहराचा विकास होतो. आपल्या शहराला विकासाचं व्हिजन असणारा लोकप्रतिनिधी मिळाला नाही. मत देतांना आम्ही जे निकष लावतो, त्या निकषांमध्ये तंतोतत बसेल, असा उमेदवार नाही.
संतोष दुसंगी, रिक्षाचालक

Leave A Reply

Your email address will not be published.