कर्करोग म्हणजे काय, जाणून घ्या

“आय ऍम अँड आय विल’ या संकल्पनेतंर्गत ही मोहीम जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली 4 फेब्रुवारी हा “जागतिक कॅन्सर दिन’ म्हणून पाळला जातो. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटन (यूआयसीसी) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांमध्ये जाऊन जागृती केली जाते. या गंभीर आजाराला न घाबरता हा रोग घालवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. “आय ऍम अँड आय विल’ या संकल्पनेतंर्गत ही मोहिम राबविली जात आहे.

कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्‌भवणारा रोग आहे. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये किंवा अवयवामध्ये होऊ शकतो. कर्करोगाचे किती तरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी नव्या पेशींची आवश्‍यकता नसतानाही पेशी विभाजन होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच “अर्बुद’ किंवा “ट्यूमर’ (गाठी) होय.

हे ट्यूमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे “बिनाइन ट्यूमर’, म्हणजे कर्करोगाची गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची गाठ सहज काढून टाकता येते. या गाठी अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत. मात्र, दुसऱ्या प्रकारात कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठींपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठींमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबर इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो.

कर्करोगाचे विविध प्रकार
तंबाखू ओढणाऱ्या व्यक्‍तींमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान सुरू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो, तेवढी फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेट्‌स ओढणाऱ्या व्यक्‍तींमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्‍यता, सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा दहा पटींनी अधिक असते. धूम्रपान करणाऱ्यांना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते.

कर्करोगाची लक्षणे
कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात. त्यासाठी कर्करोगाची शक्‍यता मनात बाळगून रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष दिले तरच कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. वजन एकदम कमी होणे, अचानक रक्तपांढरी होणे, भूक मरणे, शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव (गर्भाशयाचा कर्करोग), स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे (स्तनांचा कर्करोग), आवाज बदलणे, बसणे (स्वरयंत्राचा कर्करोग), खोकल्यातून/बेडक्‍यातून रक्‍त पडणे (फुफ्फुसाचा किंवा श्‍वासनलिकेचा कर्करोग), अन्न गिळताना आत अडकल्यासारखे वाटत राहणे (अन्ननलिकेचा कर्करोग), अन्न खाल्ल्यावर बराच काळ पोट जड वाटणे, करपट ढेकरा येणे, न पचलेले अन्न उलटणे, इत्यादी (जठराचा कर्करोग), तोंडात कोठेही बरा न होणारा, न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे (तोंडाचा कर्करोग), लघवीतून किंवा शौचातून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव (मूत्राशय, किंवा गुदाशय यांचा कर्करोग), शौच विसर्जनाच्या सवयी अचानक बदलणे, बद्धकोष्ठतेची तक्रार (मोठ्या आतड्याचा कर्करोग), कोठूनही (नाक, हिरड्या, लघवी, शौच, गर्भाशय) अचानक कारणाशिवाय रक्तस्राव (रक्तपेशींचा कर्करोग), काखेत, जांघेत, गळ्यात, दगडासारख्या कडक गाठींचे अवधाण येणे, ही कर्करोगाची लक्षणे आहेत.

– डॉ दत्तात्रेय आंदुरे,
कर्करोग तज्ज्ञ, ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर, शेंद्रे. 

Leave A Reply

Your email address will not be published.