समजून घ्यायला शिका

एके दिवशी मला माझ्या मित्राने घरी जेवायला बोलावले. घरी गेल्यावर आमच्या गप्पा सुरु झाल्या. कामाबाबत आणि इकडच्या तिकडच्या गप्पा छान सुरु होत्या. आमच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. त्या मित्राची बायको मात्र किचनमध्ये आमच्यासाठी जेवणाची तयारी करण्यात दंग होती. आमच्या ऐन रंगात आलेल्या गप्पांत येण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. त्यामुळे अधूनमधून त्यासुद्धा आमच्या गप्पांत सहभागी होऊन प्रतिसाद देत होत्या. स्वयंपाक सुरु असल्याने गप्पांच्या फोडणीत स्वयंपाकाच्या फोडणीचाही सुगन्ध चांगलाच दरवळत होता.

काही वेळाने स्वयंपाक झाला. वहिनींनी आम्हाला जेवण वाढण्यास सुरुवात केली. समोर ताटात वाढलेले अन्नपदार्थ पाहून कधी एकदाचे खाण्यास सुरुवात करतो झाले. शेवटी मित्राने,चल सुरुवात कर म्हणून ग्रीन सिग्नल दिला. आणि आम्ही जेवणास सुरुवात केली. मी ताटातील पापडाचा तुकडा घेऊन खाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात मित्राने पोळी भाजीचा पाहिलंघीस मुखात घेतला. आणि पहिल्या घासातच चेहरा वेडावाकडा करून तो रागाने उद्गारला,अगं काय गं ही भाजी किती अळणी झाली आहे, यात अजिबात मीठ नाही.

नरमाईच्या सुरत त्या वाहिनी बोलल्या,अहो गडबडीत चुकून टाकायचे राहून गेले असेल. त्यांचा तो ओशाळवाणा झालेला चेहरा पाहून मी मित्राला म्हणालो,असू दे आता त्या भाजीत थोडे मीठ टाक. मात्र तो कमालीचा संतप्त झाला होता. तो म्हणाला,मला भाजी वरून पुन्हा मीठ घ्यायला नाही आवडत. मी त्याच्याकडे पाहत होतो. त्या वहिनींचा तर चेहरा पुरताच पडला होता. तेवढ्यावर न थांबता तो त्याच्या पत्नीला म्हणाला,आता माझ्यासाठी काहीतरी दुसरी भाजी कर… मी थांबतो हातातल्या पदराने कपाळावरचा घाम पुसत त्या वाहिनी पुन्हा तडक किचनमध्ये गेल्या. मी माझ्या त्या मित्राला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु तो काहीही मनस्थितीत नव्हता. वहिनींकडून काहीतरी अक्षम्य अपराध झाल्यासारखे तो वागत होता. मी समजवायला गेलो असता तो मला म्हणाला,अरे घरातील कामे यांनी नीट करायला नकोत का? तू माझ्याजागी असता तर काय केले असते?

मी शान्तपणे उत्तरलो,मी तिला काहीही बोललो नसतो,भाजीवर मीठ घेऊन खाण्यास सुरुवात केली असती .
तो अवाक होऊन माझ्याकडे पाहत मला म्हणाला,आणि अळणीऐवजी भाजी जर खारट झाली असती तर?
मी हसतच म्हणालो,मी तिला समजून घेऊन केवळ पुन्हा असे न करण्याबाबत शांततेने समजावले असते.
तो म्हणाला, असे कसे शक्‍य आहे. मी त्याला माझ्या ऐकण्यात आलेली गोष्ट प्रॅक्‍टिकली समजावून सांगायचे ठरविले. त्याच्या घरातील एका वहीतील कोरा कागद घेतला. आणि त्या संपूर्ण कोऱ्या कागदावर पेनाने एक टिंब काढला. तो कागद त्याच्या हाती देत त्याला बोललो,मला सांग या कागदावर तुला काय दिसत आहे? क्षणाचाही विचार न करता त्याने मला अपेक्षित उत्तर दिले. तो म्हणाला,या कागदावर एक काळा टिंब आहे. मी त्याला म्हणालो,पण मला तर काहींतरीवेगळेच दिसत आहे. मला या काळ्या टिंबापेक्षा त्या पानाचा संपूर्ण पांढराशुभ्र भाग दिसत आहे.

आता त्याला माझे ते उदाहरण पटले. तो मला म्हणाला,पण या कागदाचा आणि मी माझ्या पत्नीवर ओरडण्याचा काय संबन्ध. मी त्याला समजावले,फक्त तुझी त्या घटनेकडे पाह्ण्‌याची नजर बदल. आज भाजीत मीठ नव्हते ही गोष्ट त्या पांढऱ्या कागदावरील काळ्या टिंबाप्रमाणे आहे. परंतु आपल्याला जेवण करण्यासाठी वहिनींनी घेतलेले कष्ट आणि काम हे त्या कागदाच्या पांढऱ्या भागासारखे आहे. भाजीत फक्त मीठच कमी होतं तेल,मसाला,पाणी,व इतर गोष्टी तर व्यवस्थित होत्या ना? शिवाय तुला मला जेवणासाठी ते जेवण अगदी उत्साहात आणि मेहनतीने बनविले होते. मग त्या एवढ्याशा गोष्टीवरून एवढा मोठा आकांत का?

आता माझ्या त्या मित्राला माझे म्हणणे पटले होते. त्याची चूकही एव्हाना त्याच्या लक्षात आली होती. माझ्याकडे हास्यमुद्रेने पाहत त्याने त्याच्या पत्नीला आवाज दिला,अगं ऐक काही करू नकोस फक्त येताना चिमूटभर मीठ घेऊन ये.
असे एक ना अनेक प्रसन्ग आपल्याही आयुष्यात येत असतात. मात्र इतरांना न समजून घेता केवळ एका विशिष्ट नजरेने विचार केल्याने इतरांची मने दुखावली जातात. परिणामी नात्यांत कटुता येऊन सुसंवादात दुरावा निर्माण होत असतो. म्हणूनच इतरांच्या भावनांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. इतरांना समझून घेऊन त्यांच्या चुकांना दुरुस्ती करण्याची मनमोकळेपणाने संधी दिल्यास नाती फुलण्यास नक्कीच मदत होईल.

सागर ननावरे

Leave A Reply

Your email address will not be published.