नोंद: मातृभाषेतून शिक्षण घेताना संस्कृत शिका

परिज्ञा पुरी

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर देशप्रेम, धर्मप्रेम, संस्कृतीविषयी आदर, पालक, गुरुजन यांचा आदर, नातेसंबंधांची जपणूक करणे, एकत्र कुटुंबपद्धती, नैतिक आणि सामाजिक मूल्ये इत्यादी शिकायला आणि शिकवायला सोपे जाते, आत्मसात करायलाही सोपे जाते, अर्थात कोण किती आचरणात आणतो, हा भाग अलहिदा…

आमच्या पाल्याला परकीय भाषा शिकवा, असं सांगणाऱ्या पालकांना दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात एक म्हणजे मातृभाषा शिकवा आणि शक्‍यतो मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालूच नका आणि दुसरे म्हणजे परकीय भाषा शिकवण्यापेक्षा शालेय जीवनात तरी संस्कृतच शिकवा.
ही गोष्ट खरी आहे की, वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत लहान मूल अनेक भाषा अवगत करू शकते, पण त्याचा दैनंदिन जीवनात खरोखर काही फायदा होणार आहे का, हे तपासून बघणे गरजेचे आहे.

कुठल्याही एका भारतीय भाषेचे सखोल शिक्षण आणि त्या बरोबरीने संस्कृत, या दोन गोष्टी लहानपणापासून शिकवल्या तर भाषा आणि संस्कृती या दोन्हींचा पाया पक्‍का होतो.
वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत तरी पाल्याला परकीय भाषा शिकवू नये, असे वाटते. इंग्रजी माध्यमाच्या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळत असतानाही आवर्जून मला व माझ्या भावालाही मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माझ्या पालकांचे आम्ही आभारी आहोत.

आज मी परकीय भाषाक्षेत्रात कार्यरत आहे आणि माझा भाऊ गेली 12 वर्षे अमेरिकेत इंजिनियर म्हणून काम करत आहे. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत न गेल्याने आमचे काही अडले नाही.

आणखी एक म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय 10वी पर्यंत जरी मराठीत शिकले तरी त्याने काही आभाळ तुटून पडत नाही. उलट हे विषय इंग्लिशमध्ये न शिकल्याने भारतीय भाषा या मागास नाहीत, हे मुलांना कळून येईल आणि विज्ञान व गणिताची भाषा ही इंग्लिशच असते, हा गैरसमज मुलांच्या मनातून दूर होतो.

आजही जलद आकडेमोड मी माझ्या मनात मराठीतच करते. भलेही मग उत्तर दुसऱ्यांना कळण्यासाठी इंग्लिशमध्ये सांगत असले तरीही.

सरकार जे नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणणार आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करते. माझा अनुभव असा आहे की, संस्कृत शिकले म्हणून इतर भाषा शिकायला सोप्या गेल्या. तर्काधारित विचार करणे, वाचेची शुद्धता, शुद्धलेखन, अगदी बारीक नियम समजून घेणे व पाळणे याची मनाला सवय लावणे, नियमांच्या चौकटीत राहूनही सृजनशीलता जपता येते, फुलवता येते याचा अनुभव, पाठांतर करण्यामुळे मेंदू ताजातवाना ठेवणे, धार्मिक व देशी साहित्य वाचण्याची प्रेरणा आणि एक समृद्ध जीवन जगण्याची आकांक्षा, अशा आणि आणखी बऱ्याच गोष्टी मला संस्कृतने भेट म्हणून दिल्या. मराठी आणि संस्कृत इतक्‍या जवळच्या भाषा आहेत, की मराठीतून शिकले म्हणून संस्कृत शिकणं मला खूपच सोपं गेलं.

इंग्लिश काळाची गरज आहे आणि परकीय भाषा असूनही मराठी माध्यमांच्या शाळेत ती पहिलीपासून शिकवली जाते, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळेच त्या भाषेतून शिक्षण घेण्याची गरज मुळीच नाही. ई-मेल लिहिणे, पत्रव्यवहार करणे, प्रेझेंटेशन देणे, रिपोर्ट तयार करणे इत्यादीसाठी लागणारे इंग्लिश तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून शिकण्यानेसुद्धा मिळू शकते.

अनेक इंजिनियर्स, डॉक्‍टर्स, शास्त्रज्ञ, विश्‍लेषक इत्यादी आमच्याकडे येतात आणि प्रोजेक्‍टच्या गरजेनुसार एखादी परकीय भाषा शिकून पुढे निघून जातात. तेच धोरण आपण इंग्लिशच्या बाबतीतही अवलंबू शकतो. अनेक भाषातज्ज्ञ याच पद्धतीने परकीय भाषा आत्मसात करतात. उदाहरणार्थ, आज इंग्लिश किंवा जर्मनला जास्त मागणी आहे, तर ती शिकायची आणि त्यात काम करायचं. उद्या चिनी किंवा जपानी असेल तर ती शिकायची. पण त्यासाठी कुठल्याही कंपनीचे लोक त्या भाषेतून शिक्षण घेत नाहीत तर गरजेनुसार ती भाषा आत्मसात करतात, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेत शिक्षण घेण्याची जी संधी सर्वांना मिळत आहे, ती कोणीही सोडू नये, असं मला
मनापासून वाटतं.

Leave A Reply

Your email address will not be published.