कर्मचाऱ्यांमध्ये संपर्क राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे पाऊल
पुणे – घाटामध्ये रेल्वेचे चालक, गार्ड आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संपर्क राहावा, यासाठी रेल्वेकडून बोगद्यांमध्ये “लिकी केबल’ बसविण्यात येत आहे. येत्या काळात बोर घाट आणि कसारा घाटामधील बोगद्यांमध्ये अशा प्रकारचे काम करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे अंतर्गत असणाऱ्या बोर घाट आणि कसारा घाट विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय या परिसरात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे गाड्यांच्या संचलनामध्ये अडथळे येतात. या परिस्थितीमध्ये रेल्वेचे लोको पायलट (चालक) आणि गार्ड यांमध्ये संपर्क होणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा पावसामुळे यामुळे अडथळे निर्माण होतात.
याच पार्श्वभूमीवर आता रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करण्यात येणार आहे.
लिकी केबल्स प्रामुख्याने बोगदे, खाणी, लेण्या आदींमध्ये वापरण्यात येतात. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या केबल्सद्वारे संपर्क झाल्यास आपत्ती टाळण्यासाठी मदत होणार आहे. मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई मार्गावरील बोर घाटातील मंकी हिल ते खंडाळ्यादरम्यानच्या 49 क्रमांकाच्या बोगद्यामध्ये या केबल बसवल्या आहेत. हा बोगदा जवळपास 2 किलोमीटर अंतराचा आहे. मागील वर्षी या बोगद्यामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली.
यामध्ये रेल्वेच्या चालक आणि गार्डकडे वॉकी टॉकी देण्यात आले असून, यामुळे लोको पायलट, गार्ड आणि जवळच्या स्टेशनच्या अधिकारी एकमेकांशी संपर्क साधू शकणार आहेत. या अंतर्गत बोगद्यामध्ये विशिष्ट प्रकारची केबल जोडण्यात आली आहे. यातून उत्सर्जित होणाऱ्या लहरींमुळे संपर्कातील अडथळे कमी होतात.
यापूर्वी देखील या प्रकारे संपर्क करता येत होता. मात्र, या यंत्रणेमुळे विनाअडथळा संपर्क होण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. लिकी केबल्समुळे लोको पायलट आणि गार्डना संपर्क साधणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे