बगदाद – इराकच्या अर्थसंकल्पात सध्याच्या आर्थिक स्थितीवर उपाययोजना म्हणून इराकी दिनारचे अवमुल्यन करण्याचा व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची बाब अर्थसंकल्प जाहीर व्हायच्या आतच बाहेर फुटल्याने इराक मध्ये मोठीच खळबळ उडाली आहे. या प्रस्तावाने नागरीक चांगलेच धास्तावले आहेत.
इराकी संसदेचा हा अर्थसंकल्प अजून प्रस्तावाच्याच स्वरूपात आहे. तो संसदेत मांडून त्यावर संसदेची अनुमती घेतली जाणार आहे. पण त्या आधीच हा प्रस्ताव बाहेर फुटला आहे.
सध्याच्या इराकी दिनारचा दर प्रति डॉलर 1182 इतका आहे. तो घटवून 1450 इतका करण्यात येणार आहे.त्याची माहिती सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने इराकच्या अर्थमंत्रालयाने नापसंती व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पातील हा महत्वाचा निर्णय बाहेर फुटल्याबद्दल इराकी अर्थमंत्रालयाने तीव्र खेद व्यक्त केला आहे. अर्थमंत्रालयाच्या या प्रस्तावाला उद्या शनिवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येणार होती. बाहेर फुटलेला अर्थसंकल्प खरा आहे पण त्यात संसदेच्या चर्चेच्यावेळी काही फेरबदलही होऊ शकतात असे आता अर्थमंत्रालयाकडून सांगितले जाऊ लागले आहे.
इराक मध्ये येत्या जून महिन्यात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे जनतेतील या निर्णया विषयीचा नाराजीचा फटका सरकारला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान चलन बाजारात इराकी दिनारचे मुल्य आज आणखी घटले असून एक डॉलरची किमंत चलन बाजारात आता 1300 इराकी दिनार इतकी झाली आहे.