पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पहिल्या ‘लीग ऑफ लिजंड्स करंडक’ (४० वर्षावरील गट) १०० चेंडू क्रिकेट स्पर्धेत फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने रेवेल विनर्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. रायगड वॉरीयर्स संघाने भाऊ कोकणे क्लबचा १ गडी राखून पराभव करून स्पर्धेत रौप्यचषक पटकावले.
दापोली येथील रॉयल गोल्डफिल्ड क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या सुवर्णचषकाच्या लढतीमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणार्या रेवेल विनर्स संघाचा डाव ९१ धावांवर मर्यादित राहीला. अरविंद चौहान (२५ धावा) आणि सौरभ रवालिया (नाबाद २४ धावा) यांनी संघाचा डावाला आकार दिला. सचिन कापडे याने १५ धावांमध्ये ४ गडी बाद करून रेवेल संघाच्या डावाला वेसण घातली. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने हे लक्ष्य ८० चेंडूत व १ गडी गमावून पूर्ण केले. सचिन जयवंत (नाबाद ३७ धावा) आणि हृषीकेश मस्त्ये (२७ धावा) आणि श्रीनिवास सरवदे (२२ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून देत विजेतेपदाला गवसणी घातली.
रौप्यचषकाच्या लढतीमध्ये सतिश देवकर याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे रायगड वॉरीयर्स संघाने भाऊ कोकणे क्लबचा एक गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एस.आर. सिटी डेव्हलपर्सचे संचालक रोशन मोरे, स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स देण्यात आले.
सामन्याचा संक्षिप्त निकाल (अंतिम फेरी, सुवर्णचषक) :
रेवेल विनर्सः १०० चेंडूत ७ गडी बाद ९१ धावा (अरविंद चौहान २५, सौरभ रवालिया नाबाद २४, सचिन कापडे ४-१५, समीर तांबोळी १-९) पराभूत वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः ८० चेंडूत १ गडी बाद ९६ धावा (सचिन जयवंत नाबाद ३७, हृषीकेश मस्त्ये २७, श्रीनिवास सरवदे २२, सौरभ रवालिया १-१८); सामनावीरः सचिन कापडे;
अंतिम फेरीः रौप्यचषकः
भाऊ कोकणे क्लबः ८४ चेंडूत १० गडी बाद ७० धावा (गोरक्ष जाधव २१, अभिषेक मोहीते १६, सतिश देवकर ४-१०, पुष्कराज जोशी ४-१५) पराभूत वि. रायगड वॉरीयर्सः ८४ चेंडूत ९ गडी बाद ७१ धावा (अमोद दिवेकर १४, विजय निंबाळकर १३, फैयाझ लांडगे ३-१८, सुधीर साठे ३-१७); सामनावीरः सतिश देवकर;