पुणे – पालेभाज्यांचे भाव मागील काही दिवसांपासून तेजीत आहेत. तरीही मागणी घटल्याने कोथिंबिरीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 7 रुपयांनी घसरण झाली. करडईच्या भावात 4 रुपये, शेपू 3 रुपये, तर चाकवत, अंबाडी आणि चवळई प्रत्येकी 2 रुपयांनी घट झाली. तर मेथी, चुका आणि शेपुला मागणी वाढली आहे.
त्यामुळे तिन्ही भाज्यांच्या भावात जुडीमागे अनुक्रमे सहा, चार आणि तीन रुपयांनी वाढ झाली. मुळाच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
कोथिंबिरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. रविवारी 1 लाख जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती. तरीही मागणी घटल्याने कोथिंबिरीच्या भावात घसरण झाली. कर्नाटक येथून जास्त आवक असली, तरीही आता पुणे विभागतूनही आवक सुरू झाली आहे.
मेथीची आवक मात्र घटली आहे. गेल्या आठवड्यात 50 हजार जुडी झाली होती. ती कमी होऊन रविवारी 35 हजार जुडी झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मेथीचे भाव सर्वाधिक वाढले आहेत.