लसूण शंभरीत; कांदापात नागरिकांच्या पसंतीस
पिंपरी – गेल्या आठवड्यापासून नवीन पाल्याभाज्याची आवक वाढल्याने पाल्याभाज्याचे भाव गडगडले आहे. तर, भावामुळे कांद्याने नागरिकांना चांगलेच रडवले होते. मात्र, रविवारी (दि. 5) कांदाचा भाव नागरिकांच्या आवाक्यात आला, तर कोथिंबीर, मेथी, पालक व शेपूचे दर स्वस्त झाले होते. नवीन वर्षातील पहिला रविवार असल्याने नागरिकांनी भाजीपाला व मसाले पदार्थाच्या खरेदीकडे कल दिसत होता, तर थंडी वाढल्याने नागरिक लवकर बाजार खरेदी अटोपत होते.
हिवाळ्यात खास पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू व अन्य पालेभाज्याची नवीन आवक वाढल्याने पालेभाज्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र, तर दुसरीकडे टोमॅटो, वांगी, हरभरा, फ्लॉवर, गाजर, मुळा व अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर होते. खास हिवाळ्यात चांगल्या गुणवत्तेची मिळणारी कांदापात चांगलाच भाव खाताना दिसली. दहा रुपये जुडीप्रमाणे पिंपरी मंडईत सर्रास विकली जात होती. दुसरीकडे कांद्याचे भाव कमी झाले असून, 25 रुपयांपासून ते गुणवत्तीनुसार 80 रुपयांपर्यंत कांदा विकला जात होता. तर, लसूणाचा भाव स्थिर असून शंभरीत पोहोचला आहे.
नवीन वर्षाची सुरुवात झाली असून, वर्षाचा पहिलाच रविवार असल्याने नागरिकांनी अन्य खरेदी बरोबर भाजीपाला व मसाले पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसले. एरवी सायंकाळी मंडईत गर्दी होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी लवकर खरेदी करत होते.