पुणे – नवरात्रीत उपवासासाठी राजगिरा वापरतात. त्यामुळे मार्केट यार्डात रविवारी तब्बल 1 लाख जुडी राजगिराची आवक झाली. त्यामुळे राजगिराच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत जुडीमागे 4 रुपयांनी घसरण झाली. पावसामुळे दर्जा घटल्याने खराब मालाची आवक बाजारात जास्त होत आहे.
मागणी अभावी कांदापात, कोथिंबिरच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे अनुक्रमे 15 आणि 10 रुपयांनी घसरण झाली. याबरोबरच चुकाच्या भावात 6 रुपये, मेथीच्या भावात 3 रुपये, पालक, शेपू आणि चाकवतच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी घसरण झाली. तर, चवळईच्या भावात मात्र जुडीमागे 2 रुपयांनी वाढ झाली.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
कोथिंबिरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या आठवड्यात एक लाख जुडी झाली होती. त्यामध्ये वाढ होत पावणेदोन लाख जुडींची आवक झाली. यामध्ये बेळगाव येथून तीन टेम्पो आणि उर्वरित स्थानिक परिसरातून आवक झाली. कोथिंबिरीच्या आवकेमध्ये हलक्या प्रतिचा माल जास्त आहे. मेथीची आवक गेल्या आठवड्या इतकीच 50 हजार जुडी झाली.