अफाट क्षमता असलेले नेतृत्व : आ. शशिकांत शिंदे

जीवनात सुखदु:खांच्या प्रसंगांना सामोरे जात, इतरांचे भले करणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. जोडलेली माणसे, मित्र हीच त्यांची खरी संपत्ती असते. त्यामध्ये आ. शशिकांत शिंदे यांचे नाव अग्रभागी आहे. दुसऱ्याचे मन जाणण्याची अचाट क्षमता असलेले नेतृत्व म्हणजे आ. शशिकांत शिंदे. विधान परिपदेवरील त्यांची निवड ही त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. आ. शिंदे यांचे कार्य, पक्षनिष्ठा लक्षात घेऊनच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली. अशा या कर्तबगार नेत्याचा आज (दि. 19 ऑक्‍टोबर) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा…

आ. शशिकांत शिंदे यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. त्यांच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. राजकारणात सक्रिय झाल्यावर शिंदेसाहेबांना दैवत मानून आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांना श्रद्धास्थानी ठेवून माझी वाटचाल सुरू झाली. माझ्या राजकीय प्रवासात शिंदेसाहेबांप्रमाणे आ. शिवेंद्रसिंहराजेंचेही पाठबळ आहे. आगामी काळातही या दोघांचे पाठबळ निर्णायक ठरणार आहे. आ. शिंदे यांच्यासमवेत असताना, आलेल्या अनुभवांना वाढदिवसाच्यानिमित्ताने उजाळा देताना, या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची नव्याने प्रचिती येते. खरं तर माझा अन् साहेबांचा निकटचा संबंध आला, त्याला बराच काळ उलटला आहे.

सतत विकासाची स्वप्ने पाहणारा हा नेता आहे. तारुण्याकडून अनुभवी प्रौढत्वाकडे वाटचाल करणारे हे वय. त्यांचा कामाचा उरक व आवाका अचंबित करणारा आहे. जनतेची मागणी, गरज, शासकीय धोरण आणि आर्थिक स्थिती यांची सांगड घालण्याचे त्यांचे कसब वादातीत आहे. प्रत्येक प्रश्न समजून घेणं, अभ्यास करणं, अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणं, प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती समजून घेऊन निर्णय घेणं, हे त्यांच्या कार्यपद्धतीच वैशिष्ट्‌य मी अनुभवलंय. केवळ लोकांसाठी, त्यांच्या हितासाठी शिंदेसाहेबांची अविरत धडपड असते.

म्हणूनच कामाचा व्याप त्यांनी वाढवला आहे. लोकांच्या सेवेसाठी अविरत काम करणारे आ. शिंदे पाहिले की, त्यांच्या यशस्वी वाटचालीचे रहस्य उलगडायला लागते. वेग आणि वेळेचा समन्वय साधत त्यांची नॉनस्टॉप’ धावपळ मला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने पाहता आली. जनतेची गाऱ्हाणी सोडवणे, हाच त्यांनी आपला प्रपंच समजला. लोकांबद्दलची तळमळ त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही.

प्रबळ इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा, कामावरील निष्ठा, अविरत परिश्रम, सकारात्मक दृष्टी, अमोघ वक्तृत्व, भारदस्त व्यक्तिमत्व, अभ्यासू वृत्ती, संघटन कौशल्य या साऱ्यांनी मिळून तयार झालेले अद्भुत रसायन म्हणजे आ. शिंदे. ज्येष्ठांशी सलोख्याचे संबंध, सामान्य कार्यकर्त्यांशी जपलेला स्नेह, केव्हाही होऊ शकणारा संपर्क व विकासाची तळमळ या बलस्थानांमुळे त्यांचे जनमानसातील स्थान कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही.

सार्वजनिक जीवनात काम करत असल्याने त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागल्याचे मला जाणवले. जाईल तेथे माणसांच्या गराड्यात अडकून पडलेले हे व्यक्तिमत्व कौटुंबिक सुखही हरवून बसले आहे, तरीही त्यांना अखंड साथ देण्याचे व्रत वहिनींनी अंगीकारल्याचे मला नेहमीच नवल वाटते. सतत कामात व्यग्र असतानाही नित्यनेमाने पूजाअर्चा करताना आ. शिंदे यांना मी अनेकदा पाहिलंय. त्यांची ईश्वरावरील श्रद्धाच माझ्यावर कमालीचा प्रभाव टाकून गेलीय.

आ. शिंदे यांना पुन्हा लाख लाख शुभेच्छा! आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांनी एकत्र वाटचाल करावी, हीच जावळीवासीयांची भावना आहे. आ. शिंदे व जावळीकरांचे नाते अतूट आहे. ते कोरेगाव मतदारसंघात सक्रिय झाल्याने जावळीत नेतृत्वाची पोकळी निर्माण होईल का, अशी धास्ती होती; परंतु आ. शिवेंद्रराजेंनी ही पोकळी भरून काढली असून, आ. शिंदे यांची उणीव भासू दिलेली नाही.

सध्या या दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या, तरी जनतेला फारसा फरक पडत नाही. जनतेचा जीव दोघांवरही आहे. त्यांचे राजकीय पक्ष कोणते, यापेक्षा हे दोघेच जनतेसाठी महत्त्वाचे आहेत. जावळीच्या विकासात आ. शिवेंद्रराजे कुठेही कमी पडलेले नाहीत. जावळीच्या दऱ्याखोऱ्यात त्यांनी विकासाची गंगा पोहोचवली आहे.

त्यांचे खंबीर नेतृत्व, हीच जावळीची खरी ताकद आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे व आ. शिंदे एकत्र रहावेत, ही सर्वांचीच मनापासून इच्छा आहे. जावळीतील जनतेवर मनापासून प्रेम करणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी जावळीसाठी हातात हात घालून वाटचाल करावी, हीच आम्हा गिरी दाम्पत्याची हृदयापासून माउलींच्या चरणी प्रार्थना!

– ह. भ. प. सुहास गिरी,
माजी सभापती, पंचायत समिती, जावळी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.