शासन व कायदा लोकांसाठी असल्याची जाण ठेवणारे नेतृत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जयकुमार गोरे यांनी उधळली स्तुतिसुमने
खटाव – आजपर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा मी अभ्यास केला. काही कार्यक्षम मुख्यमंत्र्यांचा कारभार राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारा होता. कायदा आणि शासन लोकांसाठी असते. विकासकामांबाबत निर्णय घेताना कायद्याच्या अडचणी येत नाहीत, हे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

राजकारणाच्या पलीकडे व्यक्‍तिगत संबंध आणि मैत्री जपणारा आणि शब्दाला जागणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला, म्हणूनच आज मी त्यांच्यासोबत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयकुमार गोरे यांनी केले. दहिवडी येथे उद्या, दि. 10 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, माण-खटाव मतदारसंघाचा दुष्काळ हटविण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या.

माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिहे-कठापूर योजनेत बदल करून आंधळी धरणातून वाढीव योजना केली तर या गावांना पाणी देता येईल, असे सांगताच मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. लगेच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या योजनेला चार दिवसांत मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून तब्बल 284 कोटींचा निधीही मंजूर केला. त्या योजनेचे भूमिपूजन होऊन कामेही सुरू झाली आहेत.

खटाव तालुक्‍यातील मायणीसह सोळा आणि माण तालुक्‍यातील कुकुडवाडसह सोळा गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळावे, अशी मागणी मी केली. त्यावर लवादाने केलेल्या पाणीवाटपाचे फेरमूल्यांकन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक पावले उचलून 286 कोटींची तरतूद केली आहे. उरमोडीचे पाणी खटाव-माण तालुक्‍याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने काम सुरू आहे. या पाण्याचे वीज बिलही सरकार भरणार आहे.

उरमोडीचे पाणी 97 गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे शासन व कायदा लोकांसाठी असल्याची जाण असणारे नेतृत्व होते. विलासराव देशमुखांकडे संघटन मजबूत करणारे नेतृत्व होते. हे सगळे गुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत. अडचणींमधून मार्ग काढण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. या नेतृत्वामुळे माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लागतील, असा विश्‍वासही गोरे यांनी व्यक्‍त केला.

विरोधकांच्या आकलनापलीकडचे नेतृत्व
काही अशक्‍य असलेले निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहेत. कर्जमाफी होईल आणि मराठा आरक्षण मिळेल, असे विरोधकांना वाटले नव्हते. मात्र, जिगरबाज मुख्यमंत्र्यांनी ते करून दाखवले. राज्याच्या भल्याचे निर्णय घेताना त्यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे विरोधक नेहमीच तोंडघशी पडत आले आहेत, असे गोरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.