शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटणार

मुंबई (प्रतिनिधी) – अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उद्या, शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी भेटणार आहेत. राज्यपालांच्या भेटीत फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

24 ऑक्‍टोबरनंतर विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाने बहुमताच्या संख्याबळाअभावी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे 12 नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत अडकला आहे.

आर्थिक गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना राजभवन येथे भेट घेणार आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मात्र, राज्यपालांनी भेटीची वेळ दिल्यानंतरच त्यांना भेटता येणार आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, या भेटीत सद्याच्या राजकिय परिस्थितीवर कोणतीही चर्चा न करता फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा होणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

अवकाळी पावसामुळे 325 तालुक्‍यांतील 54.22 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रूपयांच्या मदतीला मंजूरी दिली होती. तथापि, शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हे पॅकेज अपूरे असून शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर 25 हजार रूपयांची मदत देण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – राज्यपाल

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रूग्णांना तातडीने मदत करण्यासाठी तत्काळ निधी वितरीत करण्यात यावा, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनीही फडणवीस यांच्या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना व गरीब रूग्णांना तातडीने मदत देण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.