ईव्हिएमविरोधात विरोधकांची आघाडी

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटील यांची भेट

मुुंबई (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपात इनकमिंग सुरु असताना भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीवर भर दिला आहे. सोमवारी सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शेकाप नेते जयंत पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीचा तपशिल समजला नसला तरी विधानसभा निवडणूकीत विरोधी पक्ष मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विरोधात आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांच्या नेपियन्सी रोडवरील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाची भेट घेऊन विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. ईव्हीएमच्या मुद्यावर आयोग ठाम राहिल्यास कोणती भूमिका घ्यावी, यावर विरोधी पक्षात विचारमंथन सुरू आहे. त्यापार्श्‍वभूमिवर राज ठाकरे यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

ईव्हीएमच्या विरोधात विविध संघटना येत्या 9 ऑगस्टला मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या रणनितीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची शक्‍यता आहे. राज ठाकरेंच्या भेटीबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना विचारले असता ते लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगून त्यांनी भेटीचा विषय गुलदस्त्यात ठेवला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची ईव्हीएमच्या मुद्यावर भेट घेतली. येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही जागोजागी गावसभा घेणार आहोत. सभांमध्ये विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. यात नारायण राणे सुध्दा सहभागी होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

भाजपा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे लागलीय

भाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात असून त्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांची मदत घेत असल्याचा आरोप करतानाच भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा काम केले असते तर जनतेचा आशिर्वाद मिळाला असता, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. इतर पक्ष अशा प्रकारे फोडणे हे भाजपाच्या कमकुवतपणाचेच लक्षण आहे. आज अनेक नेते भाजपामध्ये जात आहेत. पण जेव्हा नेत्यांनी अशा प्रकारे पक्ष बदलला तेव्हा तेथील जनतेने त्यांना धडा शिकविला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)