महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
‘या’ नेत्याने सोडली साथ
शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख होते. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जनावळे यांनी राजीनाम्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहीलं आहे, साहेब मला माफ करा असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी (13 फेब्रुवारी) ठाण्यातील कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते.