उत्तरेत उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते गॅसवर ; कोणाचेही पत्ते खुले होईनात

 पाणी अन्‌ उसाचा प्रश्‍न नेत्यांसाठी ठरतोय डोकेदुखी
जयंत कुलकर्णी /नगर: लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली असतांनाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र अजूनही सामसुमच दिसत आहे. उत्तरेत अकोले, संगमनेर वगळता अन्य तालुक्‍यांतील नेत्यांनी आपले पत्तेच अद्याप खुले न केल्याने उमेदवारांसह उमेदवारांची जबाबदारी स्वीकारणारे नेते सध्या गॅस असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येकाचे दुखणे वेगळेच आहे. या दुखण्याचे निराकरण झाल्याशिवाय नेते प्रवाहात येण्याची शक्‍यता दुरापास्त झाली असून, जो या दुखण्याचे निराकरण करेल, त्याच्या मागेच यंत्रण उभी राहिल, असे काहीसे दिसत आहे. उत्तरेत पाणी व उसाचा प्रश्‍न यंदा चांगलाच चर्चेत आला असून, पाणी व ऊस पळवापळवी या निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे उमेदवार देखील सैरभैर झाले आहेत.

येत्या 2 एप्रिलपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. परंतु अद्यापही उत्तरेतील बहुतांशी तालुक्‍यात निवडणुकीची धामधूम दिसत नाही. जो तो आपल्या दुखण्याना कवटाळून बसला असून, पुढील विधानसभा निवडणुकीची गणित आखत लोकसभेचे समीकरण जुळविण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार एक ते दोन तालुक्‍यांत फिरत आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे व शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली, तरी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या दोन्ही उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

अर्थात लोखंडे यांची भिस्त भाजपच्या आमदारांवर आहे, तर कांबळे यांची भिस्त सध्या तरी संगमनेरकरांवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे चिन्ह एकाही मतदारसंघात नाही. म्हणजे शिवसेनेचा एकही आमदार नाही, तर कॉंग्रेसचे चिन्ह संगमनेर, श्रीरामपूर व राहाता तालुक्‍यांत आहे. या तीन तालुक्‍यांत कॉंग्रेसचे आमदार असले, तरी सध्या आ. कांबळे यांच्या मागे संगमनेर तालुका असल्याचे दिसत आहे. राहाता व श्रीरामपूर तालुक्‍याची सर्व मदार ही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर आहे. या दोन्ही तालुक्‍यात त्यांना मानणारा मोठा कॉंग्रेसचा वर्ग असल्याने ना. विखेंची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या तरी या दोन्ही तालुक्‍यांतील ना. विखेंचे समर्थक नगर दक्षिणेत डॉ. सुजय विखेंच्या प्रचारात आहेत. त्यामुळे 23 एप्रिलपर्यंत तरी ही यंत्रणा नगर दक्षिणेत राहिल. तेथून पुढे ते काय भूमिका घेणार, यावर आ. कांबळे व खा. लोखंडे या दोघांचे भवितव्य घडणार आहे.

ज्या पद्धतीने विखे पॅटर्नचा प्रभाव दक्षिणेत आहे, तसा तो उत्तरे देखील आहे. त्यामुळे विखे पॅटर्न काय भूमिका घेणार, यावर बऱ्याच तालुक्‍यांचे गणित ठरणार आहे. अर्थात उत्तरेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा मोठा प्रभाव आहे. आ. थोरात यांच्यावर सध्या तरी कॉंग्रेस उमेदवार आ. कांबळे यांची भिस्त आहे. ना. विखेंकडून आ. कांबळे यांच्या उमेदवारीला आता विरोध होत असला, तरी आ. थोरात यांचे पाठबळ मिळत आहे. कोपरगाव तालुक्‍यात कॉंग्रेसही विखेंना मानणारी आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक काळे व त्यांचे चिंरजीव आशुतोष काळे यांनी अद्यापही आपले पत्ते खुले केले नाहीत. काळेंच्याबरोबर सध्या कॉंग्रेस आहे. पण ती विखेंना मानणारी. ते गणित आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याबाबतीत आहे. भाजपच्या आमदार आहेत. पण त्यांनी अद्याप पत्ते खुले केले नाहीत. अर्थात कोपरगावमधील शिवसेना आ. कोल्हेंबरोबर आहे. पण या मंडळीचा खा. लोखंडे यांना विरोध असून, ते वाकचौरे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कोल्हेंची सध्या तरी बघ्याची भूमिका दिसत आहे.

नेवाशात कॉंग्रेस व शिवसेनेचे अस्तित्व फारच तोकडे आहे. त्यात विखेंना मानणारे कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. तेथे माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी आमदार शंकरराव गडाख हे काय भूमिका घेणार यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. परंतु थोरात व गडाखांचे नातेसंबंध पाहता हे आ. कांबळे यांनाच मदत करतील, असे वाटत असले, तरी सध्या तरी गडाख यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. कारण गडाख ज्या प्रमाणे उत्तरेत प्रभावी ठरणार आहे. त्याच पद्धतीने ते नगर दक्षिणेत देखील महत्वाचे ठरणार आहे. नगर दक्षिणेत ते राष्ट्रवादीला व उत्तरेत कॉंग्रेस मदत करणार हे महत्त्वाचे आहे.

कारण ते सध्या स्वतंत्र शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या झेंडाखाली काम करीत आहेत. तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे हे भाजपचे आहेत. त्यांचे खा. लोखंडे यांच्याशी फारसे सख्य नाही. श्रीरामपूरमध्ये ससाणे गट आजही आ. कांबळेंच्या विरोधात आहे. मात्र राष्ट्रवादीचा आदिक गट कांबळे यांच्याबरोबर असल्याचे दाखवित असता, तरी अद्याप जाहीरपणे काम सुरू केलेले नाही. येथील कॉंग्रेस कार्यकर्ते आदेशाची वाटप पाहात आहेत. अकोले तालुक्‍यात राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. या तालुक्‍यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, भूमिपुत्रांवरील प्रेम यापूवीच्या निवडणुकीत अकोलेकरांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आ. कांबळे यांचे मताधिक्‍क्‍य केवळ संगमनेरमध्ये वाढू शकते अशी स्थिती आहे.

आ. थोरात यांच्यावर कॉंग्रेसच्या उमेदवाराची जबाबदारी आहे. अर्थात अकोले व संगमनेर यांची सहमती आहे. त्याचा फायदा कांबळे यांना होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार या लोकसभा मतदारसंघात सहमतीचे वारे वाहिले, तर कांबळे यांचे समीकरण जुळू शकते. त्यात गेल्या काही महिन्यांपासून निळवंडे पाणी व ऊस पळवापळवीमुळे उत्तरेतील नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे. यंदाच्या गळीत हंगामात उसाची पळवा-पळवी झाल्याने अनेक कारखाने अडचणीत सापडले. मोठ्या कारखान्यांनी ही पळवापळवी करून आपला हंगाम यशस्वी केला असला, तरी दुसऱ्या कारखान्यांना अडचणी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे तोही राग आता उफाळून येण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आखलेल्या गणितानुसार उत्तरेतील नेते लोकसभेत उतरणार असले, तरी जो दुखण्यावर फुकर घालेल, तो या यंत्रणेचा फायदा घेऊ शकेल. हे मात्र नक्‍की.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.