सेंट्रल बॅंकेच्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड…
कोळगाव – सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या कोळगाव शाखेच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड होऊन मनस्ताप होतो आहे. याबाबत सविस्तर असे की कोळगाव येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेची शिफ्टींग चालू असल्याचे कारण देत बॅंकेने तीन दिवसांपासून दुपारच्या सत्रात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले नाही. यातच बॅंकेने दि. 4 जूनला बॅंकेच्या दारात बोर्ड लाऊन शिफ्टींगमुळे बॅंक बंद असल्याचे सांगत ग्राहकांना खासगी पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांकडे (वक्रंगी सेंटर) जाऊन व्यवहार करण्याचे सांगितले.
खाजगी पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ठिकाणावरून पैसे ट्रान्सफर केले असता, कमीशनच्या नावाखाली ग्राहकांकडून 150 ते 200 रुपये आकारले जातात व त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. याबाबत बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी बॅंकेचे शिफ्टिंग होईपर्यंत वक्रांगी सेंटर किंवा घारगाव, पिंपळगाव पिसा, बेल वंडी, किंवा नगर येथे ग्राहकांनी आपले व्यवहार करावेत असे सांगितले. शिफ्टींग केंव्हा पूर्ण होईल असे विचारले असता, ज्यावेळी रिजनल ऑफिसमधून कोणी इंजिनिअर येईल त्यावेळेस शिफ्टिग होईल, असे बॅंकेचे कर्मचारी यांनी सांगितले. याबाबत बॅंकेचे शाखाधिकारी मंजुनाथ नाईक यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.