तळबीड येथे अवैध गुटख्यावर एलसीबीचा छापा

कराड  – राष्ट्रीय महामार्गावर तळबीड येथे उमा महेश हॉटेल व लॉजिंगच्या परिसरात अवैध गुटखा कारमधून विक्रीसाठी वाहतूक करीत असताना सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला. या कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभव रविंद्र पानसकर (वय 31), ओंकार अरुण देशपांडे (वय 31), वाहन मालक संदीप वसंतराव सावंत तिघेही रा. शनिवारी पेठ, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार जिल्हातील गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 20 रोजी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कराड-सातारा राष्ट्रीय महामार्गावर गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तळबीड येथील उमा महेश हॉटेल व लॉजिंगच्या मोकळया जागेत एक पांढऱ्या रंगाची फोक्‍सव्हॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक एम. एच. 12 जी. सी. 506 ही महामार्गाच्याकडेला संशयित रित्या उभी असलेली दिसली. त्यामध्ये दोन इसम बसलेले असल्याचे दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी सदर कारची झडती घेतली.

त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती मिळून आली. त्यामध्ये गुटखा, सुगंधी पान मसाला असा एकूण 3 लाख 38 हजार रुपयांचा माल व वाहन मिळून आले आहे. कारवाईत मिळून आलेले दोन संशयित व मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी अन्न प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा यांनी तळबीड पोलीस ठाण्यात तिघां विरोधात फिर्याद दिली आहे. तळबीड येथील हॉटेलच्या बाहेर लावलेल्या कारवर केलेल्या कारवाईतून सुमारे 210 किलो असा सुमारे 3 लाख 37 हजार 990 रुपये किमंतीचा गुटखा व 3 लाख रुपये किमंतीची फोक्‍सवॅंगन कार जप्त करण्यात आली आहे. कारमध्ये विमल पान मसाला 1 लाख 16 हजार 688 रुपये, व्ही 1 सुगंधी टोबॅको 20 हजार 592 रूपये, विमल पान मसाला लालसर पिवळसर 74 हजार 880 रुपये, व्ही 1 टोबॅको लालसर पिवळा 18 हजार 720 रुपये, विमल पान मसाला गुलाबी जांभळा 1 हजार 936 रूपये, रजनीगंधा सुगंधी पान मसाला 41 हजार 280 रुपये, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा 5 हजार 679 रुपये, आरएमडी पान मसाला 28 हजार 800, सुगंधी तंबाखू 12 हजार इत्यादी गुटखा जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, अतिष घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, संजय जाधव, पंकज बेसके यांनी सहभाग घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.