पुणे – अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं पुन्हा एकदा नव्यानं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या नव्या, फ्रेश एपिसोडसह अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर झी मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली ‘कारभारी लयभारी’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये एक युवा नेता जोशपुर्ण भाषण करताना दिसत आहे. “अरे ही माणसं आमची, हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी..” असे या भाषणातील बोल आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या टिझरनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाठमोऱ्या दिसणाऱ्या या युवा नेत्याच्या भूमिकेत कोण असेल याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली होती. दरम्यान, आता मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवरुन पडदा उचलण्यात आला आहे.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. निखिल इथं एका नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला आला आहे. शिवाय ही राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे. हे सुद्धा मालिकेचा व्हिडिओ पाहून लक्षात येत. नुकतंच मालिकेचा ऑफिशल टिझर रिलीज करण्यात आला आहे.