अलीकडेच माझ्या वाचनात आले की, लक्ष्मी परमार नावाच्या एका मुलीवर बायोपिक तयार होते आहे. त्या बायोपिकमध्ये दीपिका पदुकोण लक्ष्मीची भूमिका करणार आहे. कोण आहे ही लक्ष्मी? आठवण आहे?
ही 2005 सालची गोष्ट आहे. तेव्हा लक्ष्मी परमार सोळा वर्षांची होती. तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ बत्तीस वर्षाचा होता. माझ्याशी लग्न कर म्हणून तो तिच्या मागे लागला. लक्ष्मी शिकत होती. तिनं लग्न करायला नकार दिला. हा चिडला आणि त्यानं बहिणीच्या मदतीनं तिच्या तोंडावर ऍसिड टाकलं. त्यात तिचा एक डोळा निकामी झाला. तो आता बंद होत नाही. तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सर्जरी झाल्या. त्याच्या विरोधात कोर्टात दावा दाखल झाला; पण लगेचच महिनाभरात हा हल्ला करणारा जामिनावर सुटला. त्याचं लग्नही झालं. त्याला दोन मुलं झाली. बऱ्याच काळानंतर दाव्याचा निकाला लागला. त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ती एव्हाना संपलीही असेल. आता तो नवीन बायकोशी सुखानं संसार करत असेल.
आलोक दीक्षित याच्या पुढाकाराने काही तरुणांनी एकत्र येऊन “स्टॉप ऍसिड ऍटॅक्स’ ही संस्था सुरू केली आहे. ही संस्था ऍसिड फेकीतील बळींना मदत करते. जगभरात दरवर्षी साधारण दोनेक हजार लोकांवर ऍसिड हल्ले होतात. यामध्ये 80 टक्के बायका हाल होऊन बळी जातात. आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्यापैकी 30 टक्के अल्पवयीन मुली असतात.
या संस्थेची लक्ष्मीला बरीच मदत झाली. त्यांच्या साह्यानं तिनं उभारी धरली. ती गाते. आता ती आरजे झालीय. आधी मात्र तिच्या विद्रुप दिसण्यामुळे खूप प्रयत्न करूनही तिला कुठे नोकरी मिळाली नाही. आमीर खानच्या कार्यक्रमात तिला प्रसिद्धी मिळाल्यावर स्वतःला मिरवण्यासाठी व्यावसायिक तिला आपल्याकडे बोलवायला लागले. मात्र अजूनही अपुऱ्या वेतनावर ती “स्टॉप ऍसिड ऍटॅक्स’ या संस्थेसाठी काम करते. या मुली म्हणतात, किळस आमची करू नका. समाजातील विकृतीची किळस करा. आम्हाला वाळीत टाकण्याऐवजी ज्या पुरुषांनी हे हल्ले केले, त्यांना एकटं पाडा.
या हल्ल्यानंतर लक्ष्मीने ऍसिडच्या खुल्या विक्रीच्या विरोधात कायदेशीर लढा दिला. वारंवार सूचना देऊनही ऍसिड विक्रीचं नियमन आणि नियंत्रण का केलं जात नाही? असं सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला खडसावलं. ऍसिड हल्ल्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला. हा हल्ला झाल्यावर पीडितांना जे वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात, त्या साठी दहा ते वीस लाख रुपये खर्च येतो. या खर्चापैकी किमान तीन लाख रुपयांची तरी मदत सरकारतर्फे दिली गेली पाहिजे, असं कोर्टानं सांगितलं आहे. छेडछाड असो, ऍसिड हल्ले असोत की लैंगिक शोषण असो; या सगळ्या अत्याचारांच्या मुळाशी एकच कारण आहे. स्त्रीविषयी टोकाचा अनादर. आम्ही स्त्रियांचे काहीही करू शकतो, हा अहंकार. आणि त्यापायी पुरुष अजून किती विकृत होणार आहेत?
दिवसेंदिवस हे हल्ले वाढत चालल्याचं आकडेवारीवरून दिसतं. आपल्याला नाकारणाऱ्या मुलीच्या अस्तित्वावरच घाला घालायचा आणि तिला भयानक वेदना देऊन, तिला विद्रुप करून तिचं आयुष्य पूर्ण विस्कटून टाकायचं या विकृत हेतूने हे भयंकर हल्ले होतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा लग्न करण्यासाठी मुलगी देताना आपल्या समाजाला जराही अपराधी वाटत नाही. मेघना गुलजार दिग्दर्शित “छपाक’ या चित्रपटानंतर तरी समाजात या बाबतीत काही जागृती होते आहे का ते पाहू या.
– माधुरी तळवलकर