सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संसदेच्या दर्शनी भागातील छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे हटवून कोणत्यातरी हॉलमध्ये अडगळीत ठेवले आहेत. हे महापुरुष केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता आहेत तसेच सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे पुतळे हटवून भारतीय जनता पक्षाने त्यांचा अवमान केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 22 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करणार आहे, असा इशारा उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिला.
श्रावस्ती हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, सातारा शिवछत्रपतींची राजधानी आहे. या राजधानीतील छत्रपती शिवरायांचे वारसदार राजघराण्यातील दोन्ही राजे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. हे पुतळे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारला पाहिजे व पुतळे मूळ स्थितीत येतील यासाठी देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे आणि हे शक्य नसेल तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार आमच्या दोन्ही लोकप्रतिनिधींना राहणार नाही, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली. संसदेचे अधिवेशन 22 जुलै रोजी सुरू होत आहे. त्या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. या उपोषणात शाहू- फुले- आंबेडकर- गांधीवादी नागरिकांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष व उपराकार लक्ष्मण माने यांनी केले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावळीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव, कोषाध्यक्ष हरदास जाधव उपस्थित होते.