बारामती येथे मॅनेजमेंट गुरूंनी सल्ला देताना दिले व्यवस्थापनाचे धडे
भवानीनगर – बारामती वकील संघटनेद्वारे आयोजित केलेल्या ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर प्रा. डॉ. निळकंठ ढोणे आणि कॉर्पोरेट ट्रेनर प्रा. मनोज वाबळे या मॅनेजमेंट गुरूंना निमंत्रित करण्यात आले होते. या दोघा गुरूंनी वकीलांना तणावातून मोकळे राहण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना प्रा.डॉ. निळकंठ ढोणे यांनी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नात्यांमधील ताण, नोकरीमधील ताणतणाव, कुटुंबातील ताणतणाव, सामाजिक ताणतणाव अशा विविध पातळ्यांवर येणाऱ्या ताण तणावाचे व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे झाले असल्याचे सांगितले.
ताणतणाव दुर्लक्षित केला तर त्याचे गंभीर परिणाम शरीराला भोगावे लागतात. ज्यामध्ये डोकेदुखी, छातीमध्ये धडधड, अपचन इत्यादींचा समावेश होतो. परंतु, अधिक दुर्लक्ष केल्यास रक्तदाब आणि रक्तामधील साखरेचे वाढणारे प्रमाण अशाही व्याधी जडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी निसर्गा सोबत जोडले जाणे, संगीत ऐकणे, दूर चालायला जाणे, सात्विक आहार, रोज कमीत कमी 6 ते 8 तास अखंड झोप घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. ढोणे यांनी सांगितले.तणावातून मार्ग काढण्यासाठी कॉन्फिडन्स (आत्मविश्वास), कॉम्युनिकेशन (संवाद) आणि कन्व्हिन्सिंग (पटवून सांगण्याचे कौशल्य) आणि आर्ट ऑफ डिस्कनेक्ट (तटस्थपणे पाहण्याची वृत्ती) तयार करणे गरजेची आहे, असे प्रा.डॉ.निळकंठ ढोणे सहउदाहरण पटवून दिले.
प्रा. मनोज वाबळे यांनी ज्ञानेश्वरी मधील उदाहरणे दिली. तसेच ताण आणि अध्यात्म याची सांगड घातली. ते म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देखील ही अधीरता वाढलेली आहे. त्यामुळे मी म्हणेन की, गॅजेट्सचे नोकर होऊ नका, त्यांना तुम्हाला वापरायला देऊ नका. गॅजेट्स आपले दास आहेत, त्यांची आपल्यावर मालकी असता कामा नये, ही जाणीव नव्या पिढीला झाली पाहिजे. खरं तर संस्कारांमध्येही बदल होण्याची गरज आहे. तसेच शिक्षणपद्धतीतही थोडे बदल पाहिजेत.
टाइम मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट इत्यादी चांगल्या गोष्टी वाढत्या वयातच शिकवल्या गेल्या पाहिजेत. एकूणच ताणतणाव कमी करायचे असतील तर जगण्याचा आनंद घेण्यासारख्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत.या प्रसंगी ज्येष्ठ विधितज्ञ् ऍड. धुमाळ, ऍड. शिंगाडे, ऍड. खारतोडे, ऍड. जगताप, ऍड. पाटील, ऍड. फडतरे, ऍड. जावळे यासह बारामती वकील संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. सादर कार्यक्रमास विशेष उपस्थिती श्रीमंत कोकाटे यांची लाभली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि नियोजन बारामती वकील संघटनेच्या महिला प्रतिनिधी ऍड. वनिता भोसले यांनी केले.