श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका तरुण वकिलाची हत्या केली. ती घटना श्रीनगरमध्ये घडली. बाबर कादरी असे दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेल्या वकिलाचे नाव आहे.
कादरी यांच्यावर त्यांच्या घरातच दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चासत्रातील सहभागामुळे कादरी यांचा चेहरा अनेकांना परिचित होता. दहशतवाद्यांनी 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये कादरी यांच्यासह दोघांची हत्या केली.
बुधवारी दहशतवाद्यांनी गटविकास परिषदेचे सदस्य भूपिंदर सिंह यांची हत्या केली. ती घटना बडगाम जिल्ह्यात घडली. दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ हत्या घडवल्याने खळबळ उडाली आहे. त्या घटनांमुळे सुरक्षा दले आणखी सतर्क झाली आहेत.