पुणे – बार कौन्सिल ऑफ इंडियाने नियमात सुधारणा करीत विधी (लॉ) अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा करोना पार्श्वभूमीवर ऑनलाइनद्वारे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अन्य वर्षातील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.
करोना आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विधी अभ्यासक्रमाच्या नियमित अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन करून पुढच्या वर्गात प्रवेश घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हाच पर्याय विद्यापीठांना सूचविला होता. पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.
मात्र, बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची तरतूद नाही. त्यामुळे अशी सवलत मिळणार नसल्याचे यापूर्वीच बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केले होते.