नवी दिल्ली : कुख्यात गुंड आणि प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणातला मुख्य आरोपी असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई याने एका माध्यम समूहाला मुलाखत दिली. त्याने तुरुंगातून दिलेल्या या मुलाखतीची सध्या देशात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाखतीमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असतानाच पोलिसांकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भटिंडा कारागृहाचे निरीक्षक एन.डी.नेगी यांनी या मुलाखतीविषयी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट करत, “लॉरेन्स बिश्नोई सध्या इथेच भटिंडा जेलमध्ये आहे. त्याने दिलेली मुलाखत पंजाबमधल्या कुठल्याच जेलमधला नाही. एजन्सी रिमांडमध्ये घेऊन जातात, तिथून कुठूनतरी तो बोलत असेल. पण पंजाबच्या कोणत्याही जेलमधला हा व्हिडीओ नाही. हा जुना आहे, लेटेस्ट नाही. कारण सध्या तो भटिंडा जेलमध्ये आहे.
जेलच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, “भटिंडा जेलमध्ये जॅमर्स आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक आहे. आम्ही त्याच्यावर २४ तास नजर ठेवून आहोत. इथे फोनही चालत नाही, त्यामुळे पंजाबच्या कोणत्याही जेलमधून कोणालाही अशी मुलाखत देणं शक्य नाही.”असे त्यांनी यावेळी म्हटले.