बीडः गेल्या काही दिवसांपासून बीडची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होताना दिसत आहे. मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येनंतर बीडमधली गुन्हेगारी कशी फोफावली आहे, याचं भयाण वास्तव सर्वांसमोर आलं. त्यानंतर बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. गुरुवारी रात्री जमावाच्या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून तिसरा गंभीर आहे. ही घटना अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांसमोर यावर नियंत्रण आणणे आव्हानात्मक बनले आहे.
वाद, भांडण अन् हल्ला
गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अष्टी तालुक्यातील वहिरा या गावात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले आणि विलास भोसले तिघेही येथे आले होते. हे तिघे मूळचे हाटोलन गावातील रहिवासी आहेत. स्थानिक गावातील लोक आणि बाहेरील लोक या ठिकाणी चर्चेसाठी जमले होते. यांच्यात चर्चा झाली. यानंतर अचानक रात्री उशिरा वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की यानंतर वादाने भांडणाचे रुप धारण केले. पुढे भांडणाचे रुपांतर हल्ल्यात झाले आणि जमावाने दांडके व धारधार शस्त्रांचा वापर करत या तिघांवर भ्याड हल्ला केला. या हल्लात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्याची प्रकृती चिंतानजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून खून
या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच अंभोरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक माहितीनुसार एकूण सात संशियतांना ताब्यात घेतले आहे. अजय आणि भरत भोसले या सख्या भावांच्या मृतदेहांना अष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी मयतांच्या नातेवाईंनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सखोल तपासाला सुरूवात केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बीडमध्ये कायदा सुवस्थेचा प्रश्न गंभीर
जमावाने हल्ला केल्याच्या घटनेचा तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आधीच बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता या जमावाने केलेल्या हल्ल्याची चर्चा होत आहे. यामुळे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था फक्त नावालाच उरली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आंबेजोगाईत हवेत गोळीबार
ही भ्याड हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमधील आंबेजोगाईमधून हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोरेवाडी परिसरात हा हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.