वेलिंग्टन – वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) खेळाडू ठरणार आहे. महिलांच्या 87 किलोपेक्षा अधिक वजनी गटात हबबार्ड सहभाग घेईल, अशी माहिती न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने (एनझेडओसी) दिली आहे.
43 वर्षीय हबबार्डने यापूर्वी 2013 साली पुरुषांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला होता. न्यूझीलंडच्या नागरिकांनी मला प्रोत्साहन व पाठिंबा दिला असून, मी कायम त्यांची ऋणी राहीन, अशा शब्दांत हबबार्डने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ट्रान्सजेंडर खेळाडूला महिला म्हणून स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. 2015 सालापासून हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.
तिने 2017 सालच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत रजतपदक मिळवले होते. तसेच सामोआ येथे झालेल्या 2019 सालच्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले होते. तिने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती.