पुणे/हडपसर – करोनाच्या संकट काळात भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीतर्फे राज्यात साडेतीन हजार डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यरत राहून राजकारणविरहित सेवा देत आहेत. करोना संकटात व भविष्यातील साथीच्या आजारांना कसे तोंड द्यावे याची रणनीती तयार करण्यात आली आहे. याची सुरुवात म्हणून दिल्लीच्या धरतीवर राज्यात गोरगरिबांना मोफत उपचार मिळवण्यासाठी मोहल्ला क्लिनिकचा प्रारंभ नाशिकमधून करण्यात आला आहे, असे वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले.
पुणे भाजप पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी आढावा बैठकीत डॉ. गोपछडे बोलत होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, मराठवाड्यातून आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये लोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी फार्मसी, मेडिकल विभागातील पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक व वैद्यकीय क्षेत्रातील बाबींवर चर्चेत सहभाग घेतला. यावेळी करोनाच्या संकटकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा करोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. या संकटावर मात करताना शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत वैद्यकीय आघाडीच्या सर्व विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
आघाडीच्या कार्याचा गेल्या तीन वर्षांतील आढावा घेताना डॉ.अजित गोपछडे यांनी, आगामी काळात संघटना बांधणी गाव पातळीपर्यंत वाढवण्यासाठी व संघटना मजबुतीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील एम.एस.एम.ई.च्या योजनांविषयी संधींविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणी, रुग्णालय व डॉक्टरांवर होणारे हल्ले, खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांची विमासुरक्षा, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, सरकारी डॉक्टर्स यांच्या प्रश्नाविषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार ते थेट माननीय राज्यपाल महोदयापर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
प्रस्ताविक व आयोजन डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीन भगली, डॉ. सुनील आवारी, डॉ. स्मिता काळे (मुंबई संयोजक) डॉ. राहूल कुलकर्णी (ठाणे संयोजक), डॉ. मानसी जाधव, डॉ.प्रमोद कुबडे, डॉ.विष्णू बावणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. उज्वला हाके यांनी केले व अनूप सिंग गौड यांनी आभार मानले.