नवी दिल्ली – इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्थेने छोट्या उपग्रहांचे अंतरीक्षात प्रक्षेपण करण्यासाठी आज एसएसएलव्ही हे नवीन रॉकेट लॉंच केले. तथापि यशस्वी उड्डाण होऊनही हे रॉकेट आपल्या निर्धारीत लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाही, त्यामुळे ते अपयशी ठरले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष प्रक्षेपण केंद्रातून या रॉकेटचे उड्डाण झाले होते.
इस्त्रोने म्हटले आहे की या रॉकेटने सारे अपेक्षित टप्पे यशस्वीपणे पार पाडले. परंतु ज्या कक्षेत हे रॉकेट स्थीरावणे अपेक्षित होते, त्या कक्षेपर्यंत ते पोहचू शकले नाही. यातून सोडण्यात आलेले उपग्रह आता कोणत्याही कामाचे राहिलेले नाहीत असेही इस्त्रोने म्हटले आहे. हे कशामुळे झाले याची कारणे इस्त्रोच्या वैज्ञानिकांना समजली असून त्यात आता पुढील काळात सुधारणा केल्या जातील अशी माहिती इस्त्रोच्यावतीने देण्यात आली आहे. या संबंधात तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाणार असून ती समिती या अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करणार आहे.
दरम्यान इस्त्रोतर्फे एसएसएलव्हीची डी 2 ही नवीन आवृत्तीही लवकरच प्रक्षेपित केली जाणार आहे. आज प्रक्षेपित करण्यात आलेले एसएसएलव्ही हे रॉकेट 34 मिटर लांबीचे होते. ज्याची लांबी पीएसएलव्हीपेक्षा दहा मिटरने कमी होती. त्याचा व्यासही 2.8 मीटर ऐवजी 2 मीटर इतकाच होता.पीएसएलव्हीचे वजन 320 किलो इतके होते त्या तुलनेत या एसएसएलव्हीचे वजन 120 किलो इतकेच होते.
पीएसएलव्ही हे इस्त्रोचे सर्वात यशस्वी रॉकेट म्हणून गणले जाते. परंतु त्यातून नेहमीच मोठ्या उपग्रहांच्या प्रक्षेपक्षणाचे कार्य केले जाते. तथापि लहान उपग्रहांसाठी इस्त्रोने आज हे नवीन रॉकेट लॉंच केले होते.