एसपी सातपुतेंचे आदेश; वाहतूक पोलीसांच्या कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करा
सातारा – शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहनांना दंड करणारी पारंपारिक पावती पुस्तके (जीएम) आता हद्दपार झाली आहेत. बेशिस्त वाहनधारकांना जागेवरच दंड करण्यासाठी शनिवार (दि.1) पासून येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेला व जिल्हा वाहतूक शाखेला 49 ई- चलन मशीन दिली आहेत. त्यातील 34 मशीन शहर वाहरूक शाखेला तर 14 मशीन जिल्हा वाहतूक शाखेला दिली गेली आहेत.
त्याद्वारे वाहनधारकांकडून दंड आकारला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वाहतूक पोलीसांशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्या वाहनधारकांवर शासकीय कामाथ अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने भविष्यात वाहतूक पोलीसांशी दंडासाठी हुज्जत घालणे वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘पोलिस प्रशासनाने ‘एक राज्य एक ई चलन’ ही प्रणाली विकसित केली आहे. यापूर्वी मुंबई, ठाणे, पुणे या मेट्रो शहरात लागू केलेली ही प्रणाली साताऱ्यात सुरु केली आहे. शहर वाहतूक पोलिस आणि वाहनधारकांच्यात दंडात्मक आकारणीवरुन अनेकदा वाद होतात. त्यातून अनेकदा तक्रारींचे प्रसंग निर्माण होत होते. आता हे वादाचे प्रसंग दिसणार नाहीत. शहरासाठी 35 ई-चलन मशीन दिली आहेत.
या मशीनद्वारे शनिवारपासून दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास संबधित वाहनाचा त्या ठिकाणीच फोटो काढला जाणार आहे. मोटार वाहन उल्लंघनाचे नियम, कलमनिहाय पोलीसांनी आकरलेल्या दंडाच्या रक्कमेची माहिती वाहनधारकाच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. त्यासह दंडाची रिसीट दिली जाईल. दंड आकारणी डेबिट कार्डद्वारे केली जाईल.
कार्ड नसल्यास रोख रक्कमही आकारली जाणार आहे. एका वाहनधारकावर राज्यात किती ठिकाणी कारवाई झाली आहे, त्याच्या दंडाची एकत्रित रक्कमेची माहिती या यंत्रणेमुळे उपलब्ध होणार आहे. तसेच वारंवार नियम मोडणाऱ्यांची माहितीही या व्यवस्थेमुळे तात्काळ मिळणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्यासह वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
शाहूपुरी वाहतूक शाखा बंदच राहणार
परवानगी नसल्याचे कारण पुढे करून तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी बंद केलेली शाहूपुरी वाहतूक शाखा आता कायस्वरूपी बंदच राहणार आहे. एसपी पंकज देशमुखांच्या बदलीनंतर नव्याने आलेल्या तेजस्वी सातपुते या शाहूपुरीची शाखा सुरू करतील, असा होरा पोलीस दलातील काहींचा होता. मात्र, शाहूपुरी वाहतूक शाखा सुरू करणार का? या प्रश्नावर बोलताना, सातारा शहर वाहतूक शाखेलाच मनुष्यबळ वाढवून वाहतूक नियमीत केली जाईल त्यामुळे शाहूपरी वाहतूक शाखा सुरू करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे,तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. त्यामुळे शाहूपुरी वाहतूक शाखेचा मार्ग आता कायमस्वरूपी बंद झाल्याचे स्पष्ट आहे.