हसणे जीवन सुंदर करण्याचे औषध

हसण्याने आरोग्य चांगले राहते असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. पण, काहींना त्याबद्दल शंका असू शकते. अशावेळी आपणच प्रयोग करून पाहिला तर? आपणच सतत हसतमुख राहील आणि त्याचे काय परिणाम होतात, हे पाहिलं तर? त्यापूर्वी हसण्याचे फायदेही जाणून घेऊयात. म्हणजे हे फायदे आपल्याला होतात की नाही, हेही पाहता येईल….

हास्यामुळे बदलेल मन…

तणाव, दुःख, असेल तर हास्य हे औषधासारखे काम करेल. मन, शरीर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी, दुःखातून बाहेर येण्यासाठी हास्यासारखा उपाय नाही. हास्यामुळे मनावरील दबाव कमी होतो. आशा वाढते. हास्यामुळे नवता जाणवते. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य सुधारते.

त्यामुळे हास्य आरोग्याला चांगले आहे. बाळ पहिल्या आठवड्यापासून हसू लागते. आणि महिन्याभराच्या आत मोठ्यांदा हसू लागते. आतापर्यंत तुमचा स्वभाव हा विनोदासाठी, हास्यासाठी फारसा पोषक नसला तरी तो तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर बदलू शकता. हास्य-विनोद करण्यासाठी वयाची कोणतीही आडकाठी नाही.

हास्यामुळे वाढतात एडोरफिन्स हार्मोन्स्‌

हसून पहा. शरीर रिलॅक्‍स झाल्यासारखे वाटेल. कारण हास्यामुळे शारीरिक ताण, थकवा कमी होतो. स्नायूंवरील ताण कमी होतो. हे सर्व होते, कारण हसण्यामुळे शरीरातील एडोरफिन्स्‌ हार्मोन्स्‌ वाढतात. मेंदुला छान वाटायचे काम हे रसायन करते. त्यामुळे काही काळासाठी दुखण्याची, दुःखाची भावना कमी करते. हृदयाचे सरंक्षण करते. रक्‍तवाहिन्यांचे काम सुधारते.

रक्‍ताभिसरण सुधारते. त्यामुळे हृदयविकार होण्यापासून बचाव होऊ शकतो.हसण्यामुळे तणाव वाढवणारे हार्मोन्सही कमी होतात. हास्यामुळे शरीर, चेहऱ्यावरील नसा ताणल्या जातात. त्यांना व्यायाम मिळतो. नाडीचे ठोके सुधारतात. श्‍वास अधिक घेतला गेल्याने ऑक्‍सिजन मिळतो.

कसे हसाल?

हसण्यासाठी एकत्र या. विनोदी चित्रपट पहा. विनोदी साहित्य वाचा. एकमेकांना विनोद सांगा. फनऍक्‍टीव्हिटीज्‌मध्ये भाग घ्या. घरात, ऑफीसमध्ये हास्यचित्रे लावा. यामुळे तुम्हांला, इतरांनाही मनमोकळे हासता येईल. आजूबाजूचे वातावरण
हलके – फुलके ठेवा. कधी आपल्याही आयुष्यात विनोदी घटना, प्रसंग घडतात. त्यावरही हसायला शिका.

सामाजिक, कौटुंबिक फायदे

एखादी व्यक्‍ती तुमच्याकडे बघून खूप छान हसली तर तुमचे मनही प्रसन्न होते. हो ना? कारण हा हसण्याचा प्रभाव आहे. तुम्हीही इतरांकडे बघून छान हसलात तर त्या व्यक्‍तीला तुमच्याबद्दल चांगले वाटेल. हसण्यामुळे नातेसंबंध सुधारतात. कुटुंबीयांशी अधिक चांगले संबंध होतील. ऋणानुबंध वाढतील. इतरांशी वागणे सकारात्मक, आशादायी होते. कामाच्या ठिकाणी अनेकांना टीमवर्क करायचे असते. त्यामध्ये कधी काही कुरबुरी होणार. पण, हास्य मंत्रामुळे टीमवर्क सुधारू शकते. समस्या सोडविण्यासाठीही हास्य मदत करेल.

हास्याचे आणखीही काही फायदे

विचार सकारात्मक राहतात. आशादायी होतात. साहस व शक्‍ती वाढते. त्यामुळे आशेचा नवीन किरण दिसू लागतो. एखाद्या दुःखद क्षणात एखादे स्मितही नवीन आशा देऊ शकते. तुमचा दृष्टिकोन बदलतो. वस्तुस्थिती अधिक यथार्थपणे समजण्यास मदत होते. दुसऱ्याला सतत टोकणे, ताशेरे ओढणे, शंका घेणे यातूनही तुमची सुटका होऊ शकते. सर्जनशीलता वाढते.

मानसिक फायदे

– हसण्याचे शारीरिक फायदे आहेत.
– तसेच मानसिक फायदेही खूप आहेत.
– आनंद वाढतो. भीती, अस्वस्थता कमी होते.
– तणाव कमी होतो. मूड चांगला राहतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.