Congress Candidate Anjana Chaudhary Missing : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या ऐन धामधुमीत लातूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली असून, निलंगा तालुक्यातील तांबडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार अंजना चौधरी यांचा अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजना चौधरी या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. बराच वेळ उलटूनही त्यांचा मोबाईल संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. त्यांनी उमेदवाराच्या अपहरणाचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे अधिकृत निवेदन दिले असून, अंजना चौधरी यांचा तात्काळ शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही घटना निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्यासाठी घडवून आणली का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. Congress Candidate Anjana Chaudhary Missing पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, अंजना चौधरी यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात नेमकं काय सत्य समोर येतं, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. हे ही वाचा : ZP elections : मोठी बातमी..! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा बिनविरोध ट्रेंड; ‘हे’ तीन उमेदवार विजयी