लातूर: शेवटच्या थरावरून पडल्याने 17 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

लातूर – अहमदपूर येथे दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळून जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगावमध्ये काल एका गोविंदाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्यानंतर लातूरमधील आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबईत 2 गोविंदा गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 238 गोविंदा जखमी आहेत.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साठेनगर भागातील एका गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. यात उदय महेश कसबे हा 17 वर्षाचा नवतरुण मुलगा सहभागी झाला होता. शेवटच्या थरावर तो गेला आणि तोल ढासळून खाली पडला होता. यात जबर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर अहमदपूर येथे उपचार करण्यात आले होते. मध्यरात्री पोटात दुखत असल्यामुळे त्याला लातूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे.





